tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

जय जय स्वसंवेद्या

‘प्राण सर्वश्रेष्ठ आहे’ असे मागील भागात पाहिले. आता छांदोग्य उपनिषदातील कथेतून ‘प्राणाचे महत्त्व’ पाहू. शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध हे जाणण्यासाठी जी ज्ञानेंद्रिये उपयोगांत येतात, त्या इंद्रियात भांडण सुरू झाले. डोळे म्हणाले “मी नसलो तर जगाचे सौंदर्य बघता येणार नाही, मग जीवनाचा उपयोग काय? जीवन अतिशय कष्टप्रद होईल. म्हणून सर्व इंद्रियांमध्ये मीच श्रेष्ठ आहे.” कान म्हणाले, “पक्षांचा किलबिलाट, उत्तम कर्णमधुर संगीत ऐकता येत नसेल तर जीवनात एक मोठी उणीवच राहील. म्हणून मीच श्रेष्ठ आहे.”

त्वगेंद्रियाने (त्वचा) ठासून सांगितले, “माझ्याशिवाय स्पर्शसुख अनुभवता येणार नाही. माझे महत्त्व मान्यच करायला पाहिजे.”

चटकदार रीतीने रसनेंद्रियाने (जीभ) आपले म्हणणे मांडले, “अगदी खमंग पदार्थांपासून सर्व पदार्थांच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी माझी आवश्यकता आहेच.” शेवटी नाकाने आपला वरचढपणा कथन केला “निरनिराळ्या प्रकारच्या पुष्पांच्या सुगंधाचा अनुभव माझ्यामुळेच येतो, म्हणून मीच श्रेष्ठ आहे.” सर्व इंद्रियांचा राजा, प्राण, सर्व ऐकत होता.

प्राणनाथ म्हणाले, “चालू द्या तुमची एकमेकांवरची कुरघोडी. मी अर्धा तास बाहेर जाऊन येतो.” असे म्हणताच इंद्रियांमधील प्रत्येकाचे सामर्थ्य नष्ट होऊ लागले. डोळ्यांचे दिसणे बंद झाले, कानांना ऐकू येईना, त्वचेला स्पर्श कळेना, जिभेचे रसज्ञान नष्ट झाले, नाकाचे वास येणे थांबले. सर्व इंद्रियांनी विचार केला “प्राणाच्या नुसत्या बाहेर जाण्याच्या विचाराने आपली ही स्थिती झाली. तो खरोखरच बाहेर पडला तर आपली काय वाट लागेल!” चूक लक्षात येऊन त्यांनी प्राणनाथांना प्रार्थना केली “तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. आमची सर्व शक्ति तुमच्यामुळेच आहे. तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही.” याचा अर्थ स्पष्टच आहे – प्राणतत्त्व हेच जीवनाचे श्रेष्ठ तत्त्व आहे.

सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. सभोवतालच्या भयावह वातावरणांमुळे शरीराचा-मनाचा समतोलपणा राखणे अशक्य आहे. ‘सिद्धयोग-महायोग’ साधनेनेच समतोलपणा राखता येतो हे सत्य आहे. श्रीमद्भगवद्गीता ‘सिद्धयोग-महायोग’ शास्त्राचा प्रमाण ग्रंथ आहे. “ही सर्वश्रेष्ठ राजविद्या सर्वांसाठी आहे” अशी भगवंतांचीच आज्ञा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीतून ही विद्या तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे महान कार्य केले. हे वास्तव आहे.

श्रीज्ञानेश्वरीची प्रासादिक सुरवात पाहू या-
ॐ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा|

……………………..

<< ब्रह्मानंदी लागली टाळी