सगुण निर्गुण
आनंद
श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांनी मानवाच्या मन-बुद्धीला सुखावणारे आनंदाचे वर्णन केलेले आहे.
‘आजि आनंदी आनंद | मनी भरला पूर्णानंद || वाचे बोलता तो न ये | बुद्धिबोध स्तब्ध राहे ||’
मनाला व बुद्धीला सुखाचा अनुभव होणे यालाच आनंद म्हणतात. या आनंदाचे वर्णन शब्दात करता येणे अशक्य आहे.
प्रत्येक मनुष्य आनंदीच आहे. ऋषि, मुनि, संत यांचे विविध प्रासादिक ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, योगवाणी, यांमधून मंत्र, उपासना आणि साधना याद्वारे मानव हा आनंद वर्धिष्णु करतो. भगवंतच आनंदस्वरूप असल्याने योगेश्वर कपिल महामुनींनी अत्यंत सोप्या भक्तीमार्गाद्वारे ‘भगवंतांच्या स्मितहास्याकडे बघून आनंद मिळवा’ असे सांगितले. असेच जगद्गुरु शंकराचार्यही ‘परब्रह्म पांडुरंगाचे स्वरूप पाहून आनंद मिळवा’ असा उपदेश करतात. अशा ध्यानामुळे मन तन्मय होऊन जाते. मग अन्य काही पाहण्याची इच्छाच होत नाही. संत-महात्मे हे प्रत्यक्ष भगवंतांचेच सगुण रुप आहेत. म्हणून त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांना आनंदाची अनुभूति प्राप्त होते.
तैत्तिरीय उपनिषद् आनंदवल्ली प्रकरणात, मनुष्यापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवांना अनुभवाला येणाऱ्या आनंदाचे वर्णन आहे. मनुष्याचा आनंद हे मानक (unit/युनिट) घेतले आहे. त्याच्या शंभर पटीने गंधर्वांचा आनंद आहे. गंधर्वांच्या आनंदाच्या शंभर पटीने देवतांचा आनंद आहे. देवतांच्या आनंदाच्या शंभर पटीने बृहस्पतींचा (देवांचे गुरु) आनंद आहे. बृहस्पतींच्या आनंदाच्या शंभर पटीने ब्रह्मदेवांचा आनंद आहे आणि ब्रह्मदेवांच्या आनंदाच्या शंभर पटीने ब्रह्मानंद आहे. आपल्या स्वानुभवातून संतश्रेष्ठांनी या ब्रह्मानंदाचे जे वर्णन केलेले आहे ते असे: ‘ब्रह्मानंदी लागली टाळी | मग देहाते कोण सांभाळी |’ याचा अर्थ भक्त भगवंताच्या ध्यानात तन्मय होऊन जातो आणि देहाचे भानच उरत नाही.
दुसऱ्यांच्या गुणांचे वर्णन करणे, त्यांच्या आनंदात आनंद मानणे हेच आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे. हे रहस्य अवधूतांनी यदूराजाला उलगडून दाखविले. अवधूत सांगतात, “मी सभोवतालच्या चोवीस गुरूंकडून चोवीस गुणांचे ज्ञान प्राप्त केले. म्हणून मी सहजानंदी आहे आणि हेच माझे मूळ स्वरूप आहे.”
तात्पर्य, ब्रह्मानंद हा मानवाला प्राप्त करता येतो. उपरोक्त संतांच्या अभंगवाणीतून आपल्याला हा अनुभव प्राप्त होतो हे आपल्यासाठी फारच मोठे वरदान आहे.
……………………..