प.प. श्रीशंकरपुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज चरित्र सारांश
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व बंगालमध्ये ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यांत चितलकोट येथे प्रसन्नकुमार चट्टोपाध्याय व माताजी दुर्गासुंदरी हे दाम्पत्य राहात होते. त्यांच्या पांच अपत्यामधील रोहिणीकुमार या मुलाचा जन्म १८९० मध्ये त्रिपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर येथे झाला. हेच आपले आत्मानंदप्रकाश ब्रम्हचारी म्हणजेच ‘स्वामी शंकरपुरुषोत्तमतीर्थ’ महाराज होते. त्यांचे आई वडील दोघेही भगवती काली मातेचे उपासक होते. बालपणापासूनच रोहिणीकुमारांच्या मनावर आई वडिलांचे धार्मिक वर्तनाचे संस्कार झाले होते. त्याच प्रमाणे पूर्व जन्मातील सत्कृत्यांची, संचितकर्मांची धार्मिक व आध्यत्मिक संस्कारांची बीजें सोबत आणलेली होती. साधुसंतांच्या सहवासाची त्यांना स्वाभाविक आवड असून ते ध्यान – पूजनादि साधनेत मग्न व रममाण होऊन जात.
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी त्यांनी आपल्या भावंडांचे सांत्वन करताना सांगितले होते की “हे खरे आहे की, मानव प्राण्यांना व्यक्तिगत माता असतात. परंतु एक दैवी माता (आई) आहे, जी सर्वांचीच आई आहे खरे तर तीच जगाची स्वामिनी आहे आणि तीच सर्वांच्या आदि आणि अंती असते. आपली आई त्या जगन्मातेंतच विलीन झालेली आहे. ती निश्चितपणे आपले उत्तम संगोपन करेल व आपली दु:खें दूर करील.
श्री.रोहिणीकुमार खरे तर आपल्या जन्मदात्या आईला विसरून गेले होते आणि त्यांनी पुढील सर्व आयुष्य भगवती कालिमातेच्या पुजनांतच घालविले. तिचीच कृपा आयुष्यभर संपादन करत राहिले. संपूर्णपणे स्वतःला तिच्यासाठी वाहून घेऊन त्यांनी अनेक तीर्थस्थळांच्या यात्रा केल्या, अनेक आश्रमात राहून आले, तथापि त्या दैवी शक्तीमातेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली. शेवटी मदारीपूर येथे प.प.श्रीनारायणदेवतीर्थ स्वामी महाराज यांचा कृपाशिर्वाद मिळाला आणि त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी जवळ जवळ वेधून व आकर्षित करून घेतले.
प.प. स्वामी श्रीनारायणदेवतीर्थ महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली आणि त्यांना ब्रह्मचारी म्हणून शिष्यात सामील करण्यात आले. आठ वर्षे त्यांनी आपल्या सद्गुरूंची सतत, अथक परिश्रम घेऊन सेवा केली. पूर्वबंगालची अशी एकमेव भूमी आहे कि, जी वर्षातून जवळ जवळ आठ महिने पूर्णपणे पाण्याने आच्छादलेली असते. अशा काळात जाळण्यासाठी कोरडी लाकडे जमा करणे, जवळपासच्या गावातून भिक्षा आणणे आणि आश्रमात येणाऱ्या असंख्य लोकांना जेवण पुरवणे हे काही सोपे काम नव्हते!
शिवाय गुरु हे शिस्तीचे भोक्ते असल्याने, शिष्यांना त्यांच्या लहान चुकांबद्दल शिक्षा केली जाई. श्री.रोहिणीकुमार हे अत्यंत सहनशील व शांत असत. शेवटी स्वामीजींनी जाहीर केले की रोहिणीकुमार हे सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरलेले आहेत. त्यांना शक्तिपात मार्गाचा जगात प्रसार करण्यासाठी बाहेर पडण्याचा आदेश आणि आशिर्वाद मिळाला.
श्री.रोहिणीकुमार ज्यांना आता ‘ब्रह्मचारी श्रीआत्मानंदप्रकाश’ या नांवाने ओळखले जात होते. त्यांनी खूप दूर दूरचा प्रवास केला आणि अनेक सत्पुरुषांचा सत्संग केला. त्यांनी आपली साधना सतत सुरु ठेवली आणि शेवटी स्वामी श्रीनारायणदेवतीर्थ महाराजांना संन्यास दिक्षेसाठी प्रार्थना केली. त्यांना जगन्नाथपुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचर्य स्वामी श्रीभारतीकृष्णतीर्थांकडे संन्यास दीक्षा घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांनी या ब्रह्मचाऱ्याला आनंदाने दीक्षा देण्याचे मान्य केले, व संन्यासाची दीक्षा दिल्या नंतर त्यांचे ‘स्वामी श्रीशंकरपुरषोत्तमतीर्थ’ असे नामकरण करण्यात आले.
प.प. श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराजांनी भागीरथीच्या काठी उत्तरकाशींत आश्रमाची स्थापना केली. ते या आश्रमाला शंकरमठ असे म्हणत. त्यांच्या अनुयायात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील लोकांचा समावेश असल्याने, त्यांचे शिष्य, स्वामीजी बहुधा त्यांच्या पासून दूरच असतात म्हणून चिंतातुर असत. यासाठी स्वामींनी लवकरच वाराणसी येथे “सिद्धयोगआश्रम” या नावाचा दुसरा मठ अस्तिवात आणला.
प.प. स्वामी श्रीशंकरपुरषोत्तमतीर्थ महाराजांनी असंख्य आर्त साधकांना शक्तिपात योगाची दीक्षा दिली आणि बंगाली भाषेत योगवाणी, जप साधना, गुरुवाणी इत्यादी काही पुस्तके लिहिली. ही पुस्तके हिंदी भाषेत ही उपलब्ध आहेत. ““मी कोण आहे” या मथळ्याखाली त्यांनी इंग्रजीमधून एक प्रबंधही लिहिला होता. स्वामींनी आपल्या मर्त्य देहाचा १९५८ साली कलकत्ता येथे त्याग केला आणि देवी भगवती कालीमातेत विलीन झाले.
प. प. श्रीशंकरपुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराजांनी लिहिलेला आणि प. पू. योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी मराठी अनुवादित केलेला ‘योगवाणी अर्थात सिद्धयोगोपदेश’ हा ग्रंथ श्रीवासुदेव निवास प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. कुंडलिनी शक्तिपात महायोग परंपरेत मार्गदर्शनासाठी संपूर्ण भारतात आद्य ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे.