tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

स्वस्थ बसा डोळे मिटा

भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत “मानवाला आपले कल्याण करून घेण्यासाठीच मनुष्य जन्म दिला आहे” असे सांगितले आहे. ज्याअर्थी मनुष्य शरीर मिळाले आहे त्याअर्थी तो मुक्तीस (आनंदास) पात्र आहे. म्हणून ऋषि, मुनि, संतांनी मानवाला आनंदाच्या प्राप्तीसाठी साधना, उपासना दिली आहे. या मिळालेल्या संधीचा उपयोग मानवाने या जन्मातच केला पाहिजे. तो कसा हे क्रमश: पाहू.

मानवी शरीराची रचना मस्तकापासून पायापर्यंत आहे. यामध्ये एक सुखकारक आश्चर्य आहे. पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या अखेर पर्यंत स्वतःच्या बोटांनी मोजणी केली तर आपले शरीर ९६ बोटे (अंगुले) भरते. हे मोजमाप प्रत्येकाने स्वतःच्याच बोटांनी (अंगुल्यांनी) करावयाचे आहे. एका हाताची चार बोटे (अंगुले) आडवी धरून चार-चारच्या प्रमाणात मोजावयाचे आहे. मस्तकापासून पायापर्यंत किंवा पायापासून मस्तकापर्यंत बरोबर मध्यभागी ९६च्या निम्मे म्हणजे ४८ बोटे (अंगुले) होतात. या ४८ बोटांवर (अंगुल्यावर) शरीराच्या मध्यभागी आश्चर्यकारक स्थान आहे. ते स्थान कुंडलिनीचे आहे. ते पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात आहे. अर्थात् ‘कुंडलिनीचे–महायोगाचे’ ज्ञान सद्गुरूंकडूनच प्राप्त करणे आवश्यक आहे.

‘कुंडलिनीचा–महायोगाचा’ पूर्वाभ्यास म्हणजेच ‘स्वस्थ बसा, डोळे मिटा, पहात रहा’ असा आहे. हे मागील ‘सुंदर ते ध्यान’ या भागात पाहिले आहे. यामधील ‘स्वस्थ बसणे’ पहिली प्रक्रिया आहे. योग शास्त्रकारांनी “शरीराला, मनाला सुख देणारे सुखासन” असे सांगितले आहे. यामध्ये सुख, आराम वाटेल अशी मांडी घालून बसणे महत्त्वाचे आहे. मुद्दाम पद्मासन घालू नये. बसण्यासाठी जमिनीवर लांबरुंद, जाड घोंगडी/वस्त्र असावे. तसेच कपडे सैल, मऊ किंवा पारंपारिक वेष असावा. पॅन्टमुळे शरीर जखडल्यासारखे होते. यापुढे ‘श्रद्धेने डोळे मिटणे’ या दुसऱ्या प्रक्रियेमुळे शांतता अनुभवाला येते. तिसर्‍या प्रक्रियेत ‘शरीर ढिले सोडावे’ म्हणजे स्वतःहून कोणताही प्रयत्न करू नये. चौथ्या प्रक्रियेत नैसर्गिक अर्थात् ‘आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे’. म्हणजे ‘सुंदर ध्यान’ आपोआप होते आणि आनंद मिळतो. या अनुभवाचे वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज करतात,

सर्व होणे जाणे तुझे हाती |
तुका म्हणे जेथे नाही मी-तू पण |

तात्पर्य, पूर्वाभ्यास म्हणजे ‘स्वस्थ बसा, डोळे मिटा, पहात रहा’ ही प्रक्रिया रोज करणे आवश्यक आहे.

……………………..

चैतन्य तो >>

<< आजि आनंद आनंद