Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज चरित्र सारांश
प.पू. श्री नारायणकाकांचा जन्म ३ जुलै १९२७ रोजी धर्मपरायण कुटुंबामध्ये धुळे येथे झाला. बालपणापासून त्यांना संस्कृत, भारतीय तत्वज्ञान आणि योगशास्त्राची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९५० साली प.प. श्रीलोकनाथातीर्थ स्वामी महाराज यांनी श्रीनारायणकाका महाराजांना शक्तिपात योगाची दीक्षा दिली. आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या श्री नारायणकाका महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य शक्तिपात विद्येच्या विश्वात्मक प्रसारासाठी आणि सर्वसामान्य साधकांच्या अंतिम कल्याणासाठी समर्पित केले.
प.पू. श्री नारायणकाका उच्चविद्या विभूषित होते. बी.एस.सी, बी.ई. (सिव्हील) एम.ई. (पब्लिक हेल्थ) या पदव्या त्यांनी धारण केल्या होत्या. १९८५ साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून ‘अधिक्षक अभियंता’ या पदावरून ते निवृत्त झाले.
ब्रह्मश्री प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांच्या पश्चात श्री नारायणकाका महाराजांनी श्री वासुदेव निवासचे ‘प्रधान विश्वस्त’ म्हणून समर्थपणे कार्य केले. ‘सर्वेsपि सिद्धयोगदीक्षिता: भवन्तु’ या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन योगतपस्वी प.पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यानी परंपरेचे कार्य जोमाने पुढे नेले. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिसंवादांत, धर्मसंमेलनांत त्यांनी शक्तिपात योगमार्गाची महती सांगणारी व्याख्याने दिली.
आधुनिक युगातील अनेक चिंता, तणाव, विकार यांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मानसिक शांती आणि समाधानाचा अपूर्व अनुभव देणाऱ्या ‘पूर्वाभ्यास’ या अभिनव प्राण अभ्यासाचे श्री नारायणकाका महाराज जनक होत.
११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.
श्रीवासुदेव निवास येथे ५ नोव्हेंबर २०१२ रोजी प.पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज ब्रह्मलीन झाले.