सगुण निर्गुण
सर्वव्यापक परमात्मा
‘सर्वव्यापक भगवंताचे’ वर्णन श्रीज्ञानेश्वरमाऊली प्रासादिक शब्दात करतात.
“सुवर्णाचे मणी केले| ते सोनियाचे सुतीं वोविले| तैसें म्यां जग धरिलें| सबाह्याभ्यंतरीं||”
असा ‘सर्वव्यापक परमात्मा’ दिसत नसला तरी तो नाहीं असें नाहीं. तसेंच तो आहे परंतु अनुभव नाहीं. ‘परमात्मा दिसणें-न दिसणें’ हें प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. उदाहरणांद्वारे हें समजावून घेऊं. घड्याळांत किती वाजले हें फार लांबून दिसत नाहीं. परंतु घडयाळ नाहीं असें नाहीं. डोळ्यांतील काजळ डोळ्याच्या अगदीं जवळ असल्याने दिसत नाहीं. म्हणून काजळ नाहीं असेंही नाहीं. मन विचारात असते तेव्हां बोललेले ऐकूं येत नाहीं. म्हणजे कोणी बोललेच नाहीं असें नाहीं. तसेंच समुद्रांत पाऊस पडला पण भरती अथवा ओल नाहीं, म्हणून पाऊस पडला नाहीं असेंही नाहीं.
‘परमेश्वर दिसणारा नसता तर कोणालाच दिसला नसता’. संतांच्या वचनांमधून “तो दिसतो” हें समजते. तें म्हणतात “देव देखिला देखिला, गुरुकृपे ओळखिला||” सर्व संतांची चरित्रे, वचने व त्यांनी समर्पण भावनेने केलेल्या साधना व सेवेमधून ईश्वरप्राप्तीचे मार्गदर्शन होते. सद्गुरूकृपेने प्राप्त दिव्यदृष्टि व त्यांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यास ईश्वराचे अस्तित्व जाणवते. एका प्रसंगातून हें पाहू. योगिराज श्रीगुळवणीमहाराज आपल्या गुरूंच्या, श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांच्या, भेटीसाठी ऐन उन्हाळ्यात ५९ दिवसांत १४६० कि.मी. खडतर प्रवास करीत श्रीक्षेत्र हावनूर (कर्नाटक) येथें आलें. येथें त्यांना श्रीगुरुंचे दर्शन व सत्संग लाभला. कांहीं दिवसांनी श्रीस्वामिमहाराजांनी त्यांना घरी परतण्याची आज्ञा केली. तेंव्हा श्रीगुरुंचा “वियोग होणार” या विचाराने श्रीगुळवणीमहाराज उदास झाले. “पुन्हा दर्शन कधी?” असे श्रीस्वामींना विचारताच श्रीस्वामिमहाराजांनी “हें असेंच कायम ध्यानात ठेवायचे. इकडे बघा” म्हणून आपला हात स्वत:च्या हृदयावर ठेवला. त्यांच क्षणी श्रीगुळवणीमहाराजांना श्रीस्वामिमहाराजांचे ठिकाणी ‘व्याघ्रांबरधारी श्रीदत्तप्रभु’ दिसले. त्यांना आनंद झाला. स्वत: श्रीगुळवणीमहाराज चित्रकार असल्याने त्यांनी हें दृश्य कागदावर रेखाटले जें श्रीवासुदेव निवास, पुणे येथे नित्यपूजनात आहे. हें आपणां सर्वांचे भाग्य आहे. या प्रसंगाचे रहस्य असें- “सद्गुरूकृपेने ‘सर्वव्यापी परमात्मा’ दिसतो” हेंच खरें.
तात्पर्य श्रीएकनाथमहाराजांच्या ओवीतून पाहू –
ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरूप सांवळें||
एका जनार्दनीं सबाह्याभ्यंतरी नांदे||
……………………..
ऋणमुक्त व्हा >>