सगुण निर्गुण
स्वभाव
‘स्वभाव’ म्हणजे ‘प्रवृत्ती’. योगवासिष्ठकार सांगतात, “मनुष्य जन्म घेतो तों आपला स्वभाव बरोबर घेऊनच.” तसेंच ‘स्वभावो दुरतिक्रम:|’ याचा अर्थ असा ‘मनुष्याचा स्वभाव बदलत नाहीं.’ पण श्रीमद्भागवतामध्ये “मनुष्याच्या स्वभावात उत्तम संस्कार व ज्ञानप्राप्ती यानें बदल होतो” असें उद्गार दैत्य कुळात जन्माला आलेल्या प्रल्हादाचे आहेत.
महाभारतातील धृतराष्ट्र-महर्षि व्यास यांचा संवाद आहे. धृतराष्ट्र दुर्योधनाच्या स्वभावामुळें चिंताग्रस्त होता. त्यानें महर्षि व्यासांना विचारले, “मी पुत्रप्रेमाने अंध आहे याची खंत आहे. दुर्योधनाच्या स्वभावात बदल झालेला नाहीं. त्याला चुकीचे वर्तन करण्यापासून कसें परावृत्त करावें असा मला प्रश्न आहे.” महर्षि व्यास उपदेश करतात, “हें राजा, दुर्योधनाचा स्वभाव त्याच्या जन्मतः प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर तू चांगले संस्कार करणें आवश्यक होतें. पण तूं ते केले नाहींस. तू स्वत: राजा आहेस, ‘माझा मुलगाही राजा व्हावा’ हें चुकीचे संस्कार तूं त्याच्यावर केलेस. म्हणून त्याची तीच चुकीची महत्त्वाकांक्षा वाढत गेली. अजूनही वेळ आहे. तूं त्याला या महत्त्वाकांक्षेचे काय दुष्परिणाम होतील याची जाणीव करून दे. तुझ्याकडून मिळालेल्या संस्कार व ज्ञानाने त्याचा स्वभाव बदलेल.” परंतु अगतिक होऊन धृतराष्ट्राने आपल्या नशिबाला दोष दिला. महर्षि व्यास महालातून निघून गेले. ‘चांगला स्वभाव होण्यासाठी वेळीच प्रयत्न करावें’ हा बोध यातून घेतला पाहिजे.
संतांनी ‘संस्कारयुक्त स्वभावाविषयी’ मांडलेले उदाहरण असें. सज्जनांचा स्वभाव नेहमीच गोड असतो. दूध तापवले, विरजले आणि घुसळले, कीं स्नेह, म्हणजे स्निग्ध असें लोणीच प्राप्त होते. अशा स्वभावत: शुद्ध गोड दुधाची बरोबरी कोणीच करूं शकत नाहीं. सज्जनही अशा दूधाप्रमाणेच आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा चांगला स्वभाव बदलत नाहीं.
सारांश, शास्त्र असें सांगते कीं मुलांचा स्वभाव पालकांप्रमाणे असतो. थोडक्यात आईवडिलांचे वळण मुलांना लागते. म्हणून ‘वळणावर गेलास’ अशी म्हण समाजामध्ये रूढ आहे. पालकांनी चांगले संस्कार व शिक्षण देणें हीं काळाची गरज आहे. हेंच स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.
तात्पर्य, स्मृतिकारांचा उपदेश पालक व पाल्य यांच्याबाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. मुलांनी पालकांकडून आशीर्वाद घ्यावेत. त्यामुळें मुलांना आयुष्य, विद्या, यश आणि बळ हें चिरकाल प्राप्त होते.
……………………..