सुंदर ते ध्यान
अवघा रंग एक झाला
भगवान श्रीकृष्ण ब्राह्ममुहूर्तावर ध्यान करीत असत हे पाहिले. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सुर्योदयापूर्वीची प्रसन्न वेळ. स्मृतिकारांनी ब्राह्ममुहूर्ताचे रहस्य सांगितले आहे. ते असे- ‘ब्राह्ममुहूर्ताची वेळ ध्यानासाठी लाभदायक आहेच. या ‘प्रसन्न वेळी’ मानवाची बुद्धि शुद्ध असते, मनात चांगले विचार येतात. म्हणून काही व्याधी अथवा रोग असल्यास, ब्राह्ममुहूर्तावर उठून “आपल्याला ही व्याधी का झाली?” याचे चिंतन करावे. म्हणजे “चूक काय झाली” याचे उत्तर आपोआप मिळते व निदान (डायग्नॉसिस) समजते. तर ब्राह्ममुहूर्तावर प्रत्येकाने ध्यान/साधना केलेच पाहिजे हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.
कपिल महामुनी म्हणतात “प्राणायामाने मानवी शरीरातील कफ, पित्त, वात हे दोष नष्ट होतात. या तीन दोषांमुळे शरीर जड व सांधे घट्ट होतात. प्राणायामामुळे शरीर व सांधे हलके होऊन ध्यानाचा आरंभ होतो.” म्हणजे ध्यानासाठी प्राणायाम पूरक आहे हे सिद्ध झाले. तसेच ध्यान करताना मनाचा अडथळा होतो. म्हणून श्रीभगवंतांनी अर्जुनाला मन जिंकण्यासाठी प्राणायामाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते समजावून घेऊ. मन कधी राजा बनून अत्यंत उच्च विचारांनी प्रभावित होते तर क्षणातच अत्यंत हीन विचारांमध्ये बुडून जाते. म्हणून ध्यानापूर्वी ‘प्राणायाम’ करणे आवश्यक आहे.
योगतपस्वी काका महाराजांनी सांगितलेले मनापेक्षा प्राणवायूचे श्रेष्ठत्व उदाहरणावरून समजावून घेऊ. लहान मुलांमध्ये नाक दाबून तोंड बंद करून वायु धरण्याची स्पर्धा लागते. एखाद्या मुलाने मनाच्या सामर्थ्यावर प्राण कोंडून धरला तर काय होते? सामान्यत: २०, २५, ३० किंवा अधिक सेकंदांनंतर नाकपुडीवरचा हात प्राणशक्तीच्या सामर्थ्यामुळे दूर फेकला जातो व प्राणरूपी वायु जोराने बाहेर फेकला जातो. यावरून प्राण सामर्थ्यशाली आहे हे सिद्ध होते. म्हणून ध्यानाच्या वेळी मन प्राणशक्तीवर सोडून देऊन जे होईल ते होऊ द्यावे. त्यावेळी पाठीच्या कण्यातून प्राणशक्तीचा प्रवाह वर वाहू लागतो आणि आनंदाची अनुभूति येते.
अनुभूति म्हणजे ध्यानामध्ये देवाचे दर्शन होते. देवता-दर्शनामुळे आपण स्वतःला विसरतो. अंगावर रोमांच उभे राहून डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. याचा आनंद संत सोयराबाईंच्या अभंगातून घेऊ-
अवघा रंग एक झाला|
रंगी रंगला श्रीरंग||
मी तूंपण गेलें वायां|
पाहता पंढरीच्या राया||
……………………..