tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

ब्रह्मानंदी लागली टाळी

मागील भागात ‘मी तूंपण गेलें वायां |’ म्हणजे “‘मी’ आणि ‘तू’ (भगवंत) एक आहोत” हे पाहिले. हा विषय वेगवेगळ्या उदाहरणांतून समजावून घेऊ. श्रीमद्भागवतामध्ये ‘वेदस्तुति’चा एक अध्याय आहे. यामध्ये वेदांनी भगवंतांची स्तुति केली आहे- “भगवंता तुझे अस्तित्व सर्वात श्रेष्ठ आहे. भूत-वर्तमान-भविष्य यात तूच कायम स्वरूपी आहेस. आमचे असणे हे द्वैत आहे.” म्हणजे ‘वासुदेव: सर्वम्’ हा सिद्धांत वेदांनी मांडला.

संतांनी सांगितलेले एक रुपक पाहू. मीठाला “समुद्राची खोली पहावी” असे वाटले. “किती खोली आहे” हे पाहण्यासाठी मीठ तळाशी गेले. ते परतच आले नाही, समुद्रच झाले. मीठ आणि समुद्र एकच. विशिष्ट प्रक्रियेने समुद्राचे मीठ होते. मीठ हे मूळचे समुद्रच. तसा जीव हा मूळचा ब्रह्म. ‘जीवो ब्रह्मैव नापर:|’ मीठ जसा समुद्राचा अंश तसा जीव परमात्म्याचा अंश आहे. मीठ जसे समुद्राच्या सहवासाने समुद्र बनते, तसा जीव ब्रह्मोपासनेने ब्रह्म बनतो.

एका स्तोत्रामध्ये जगद्गुरु श्रीशंकराचार्य म्हणतात, “भगवंता, आपल्यात व मा‍झ्यात कोणतेही द्वैत नाही. जोपर्यंत अज्ञान होते तोपर्यंत द्वैत होते. अद्वैत कायम आहे. परंतु प्रेमभावनेने आपल्याशी संवाद करताना जो आनंद होतो ते अनुभवामृत आहे. मी आपल्या अधीन आहे, आपण मा‍झ्या अधीन नाही. तुमच्याशी एकरूपता प्राप्त झाली तरी शरीर असेपर्यंत तुमचे चिंतन राहणार आहे. मात्र सत्य एकच आहे की मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, हीच माझी शरणागती आहे.”

ध्यानाने नित्य आनंदस्वरुप ईश्वराशी तद्रूपता होते हे आपण पाहिले. यालाच ‘सिद्धयोग-महायोग’ म्हणतात. ‘सिद्धयोग-महायोग’ दीक्षा सदगुरूंच्या संकल्प शक्तीने प्राप्त होते. असा कृपांकित साधक जेव्हा साधनेला बसतो, त्यावेळी त्याने शांतपणे काय होत आहे तिकडे पहात राहावे. त्याच्यातील चेतना शक्तीच कार्य करीत असते आणि साधकाला आश्चर्यकारक अनुभव येतात – आत्मबल वाढते, नेहमी उत्साह असतो, मन प्रसन्न राहते, प्रत्येक कार्य सोपे वाटते, सर्व शास्त्रांतील गूढ रहस्य समजते. हे सर्व अनुभव जगातील एक मोठे आश्चर्यच आहे कारण या ‘सिद्धयोग-महायोगाच्या’ अभ्यासात प्राणशक्ति हेच प्रमुख दैवत आहे. या अनुभवांचे वर्णन संतवाणीतून ऐकून आनंद घेऊ या-

‘ब्रह्मानंदी लागली टाळी |
मग देहाते कोण सांभाळी |’

……………………..

जय जय स्वसंवेद्या >>

<< अवघा रंग एक झाला