श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

नित्यबोधं चिदानंदम्

‘महायोग साधना’ एक आध्यात्मिक विज्ञान आहे. साधनेचे अंतिम लक्ष्य ‘आत्मदर्शन-परमानंद’आहे. साधनेतील अनुभव, क्षणिकदर्शन महत्त्वाचे नाही. हा विषय रमण महर्षींच्या चरित्रातून समजावून घेऊ.

पंजाबमधील एका कुटुंबातील लहान मुलगा बालरूप श्रीकृष्ण चित्रासमोर बसत असे. त्यावेळी बालरूप श्रीकृष्ण प्रकट होऊन त्याच्याशी खेळत असे. काही वेळाने ते रूप चित्रात विलीन होई. मुलालाही या प्रसंगाची विस्मृति होत असे. कालांतराने तो बालक लष्करी अधिकारी झाला. पुढे सेवानिवृत्त झाल्यावर तो गावी परत आला. त्याची बालपणातील स्मृति जागृत झाली. “पुन्हा श्रीकृष्णदर्शन व्हावे” या इच्छेने तो संत-सेवा करीत असे व संतांना विचारू लागला “मला श्रीकृष्णदर्शन होईल का? असे दर्शन घडवणारे महात्मे आहेत का?” परंतु त्याची जिज्ञासा अपूर्ण राहिली. पण श्रीकृष्णदर्शनाची तळमळ वाढत होती. अखेर एके दिवशी त्याला एक संन्यासी महात्मे भेटले. ते सांगतात “दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये अरुणाचल आहे. तेथील आश्रमात वास्तव्य करणारे रमण महर्षि तुझी इच्छा पूर्ण करतील.”

निवृत्त अधिकारी महर्षींच्या आश्रमात आला. तेथील सेवकाने सांगितल्याप्रमाणे तो दर्शनासाठी आत गेला. परंतु लगेच बाहेर आला. सेवकाने विचारले, “का बाहेर आलात?” तो म्हणाला, “पंजाबला मा‍झ्या घरी येऊन यांनी स्वत:चे महत्त्व सांगितले. हे महात्मा नाहीत.” सेवक म्हणाला, “अहो! लहानपणापासून महर्षींचे येथेच वास्तव्य आहे. ते इथून कुठेच गेले नाहीत. परंतु त्यांचे वैशिष्ट्य असे- ते भारतात सर्वत्र संचार करून उत्कट जिज्ञासूंसमोर प्रकट होऊन त्यांना मार्गदर्शन करतात.” अधिकारी पुन्हा दर्शनासाठी जाताच महर्षि म्हणाले, “श्रीकृष्णदर्शनाची इच्छा आहे ना?” तो “हो” म्हणाला. महर्षि म्हणाले, “हा पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे. या अरुणाचलावर संध्याकाळी फिरून या.” तो फिरायला गेला. त्याला श्रीकृष्णदर्शन झाले. तो देहभान विसरला, शुद्धीवर येताच लगेच आश्रमात आला. साश्रू नयनांनी महर्षींना नमस्कार केला. महर्षि विचारतात, “अरे बाबा, श्रीकृष्णाचे दर्शन झाले कां?” त्याने “हो” म्हणताच महर्षींनी उपदेश केला “लक्षात ठेव, क्षणिकदर्शन महत्त्वाचे नाही. नित्य आत्मदर्शन महत्त्वाचे आहे.” अधिकारी आनंदाने घरी गेला.

तात्पर्य, ‘महायोग’ साधना ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी, दैनंदिन, दीर्घकाळ, समर्पित भावनेने होणे महत्त्वाचे आहे. साधनेतील अनुभव, देवतादर्शन तात्पुरते असते. अंतिम ध्येय ‘आत्मदर्शन-परमानंद’ आहे. संत सांगतात–

‘नित्यबोधं चिदानंदम्’

.……………………..

<< देव देखिला देखिला