सुंदर ते ध्यान
चैतन्याचे विश्वबंधुत्व
बंगालमध्ये मदारीपुर शहर आहे. येथे शक्तिपात महायोगाचे महात्मा स्वामी नारायणतीर्थदेव होऊन गेले. या शहरात त्यांचा ज्ञानसाधन आश्रम आहे. ते योगिराज श्रीगुळवणी महाराजांचे परात्पर गुरु होते. स्वामी नारायणतीर्थांनी “शक्तिपात-महायोग हा भारतातील अनेक पंथ, उपपंथ व विविध योगांना सामावून घेणारा आहे” हा सिद्धांत प्रस्थापित केला व शक्तिपात महायोगाला त्यांनी वैश्विक स्वरूप दिले. या ‘ज्ञानसाधन’ आश्रमात घडलेला प्रसंग पाहू.
एकदा स्वामी नारायणतीर्थांकडे एक विद्वान पंडित आले. त्यांनी प्रार्थना केली “मला शक्तिपात महायोग दीक्षेचे कृपादान व्हावे.” स्वामी नारायणतीर्थांनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “उद्या पाहू.” विद्वान पंडित काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी आश्रमात एक मुस्लिम युवक आला. त्याने स्वामी नारायणतीर्थांना प्रार्थना केली “मला शक्तिपात महायोग दीक्षेने कृपांकित करावे.” स्वामी नारायणतीर्थांनी युवकाकडे पाहिले आणि म्हणाले “ठीक आहे. उद्या सकाळी आपल्याला दीक्षा कृपादान होईल.” त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मुस्लिम युवकाला दीक्षा झाली, सुंदर अनुभव आले.
तेथे उपस्थित असलेल्या एका शिष्याने स्वामी नारायणतीर्थांना विचारले “स्वामीजी, विद्वान पंडितांना दीक्षा झाली नाही परंतु मुस्लिम युवकाला दीक्षा झाली. असा फरक का?” स्वामी नारायणतीर्थांनी एका उदाहरणातून समजावून सांगितले “एखाद्या घरातील वायरिंग फिटींग पूर्ण झाले आहे. दिवेसुद्धा बसवले आहेत. तिथे फक्त कनेक्शन दिले की झाले. परंतु, ज्या घरात वायरिंग फिटिंगचे काम सुरु व्हायचे आहे, तिथे कनेक्शन देऊन उपयोग काय?” शिष्य म्हणाला, “मला समजले नाही.” स्वामी नारायणतीर्थ समजावून सांगतात “मुस्लिम युवकाची आतली तयारी पूर्ण होती. त्याची पूर्ण शरणागती होती. म्हणून त्याला दीक्षा कृपादान झाले. परंतु विद्वान
पंडितांची आतली तयारी पूर्ण नव्हती आणि त्यांना विद्वत्तेचा गर्व आहे. म्हणून त्यांना कृपादान झाले नाही.” स्वामी नारायणतीर्थ आणि शिष्य यांच्यातील हा संवाद ऐकून विद्वान पंडितांमध्ये परिवर्तन झाले. त्यांनी ज्ञानसाधन आश्रमात उपासना, सेवा व सत्संगाचे अवलंबन केले आणि त्यांना कालांतराने महायोग दीक्षेचे कृपादान प्राप्त झाले.
सारांश, धर्म, जात, वय, स्त्री-पुरुष, सर्व भेदभावांच्या पलीकडे एक सर्वव्यापी चैतन्यशक्ती आहे. विश्वात बाह्य भेद असूनही चैतन्याच्या समान बंधनामुळे ‘विश्वबंधुत्व’ हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यालाच शक्तिपात महायोग विज्ञान म्हणतात. तात्पर्य संतश्रेष्ठ माऊली म्हणतात-
‘हें विश्वचि माझें घर ।’
……………………..