सुंदर ते ध्यान
पिंडी ते ब्रह्मांडी
परमात्मा सर्व जगामध्ये व्यापलेला आहे. हे ग्रंथ वाचून, शब्दांनी किंवा चित्र पाहून कळत नाही. “त्याची ओळख कशी होईल?” असे एका शिष्याने गुरुदेवांना विचारले. गुरुदेव म्हणाले “हा विषय प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून पाहू.”
“एका गावात आरोग्य विभागाने उंदरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू केली. घरोघरी उंदरांच्या विषारी गोळ्यांचे वाटप सुरू होते. एका सज्जनाला गोळ्या दिल्या तेव्हा त्याने विचारले “माझ्या घरी उंदरांचा उपद्रव नाही, ह्या गोळ्या विनाकारण कशाला
देता?” “नाही नाही या घेतल्याच पाहिजे” असे म्हणून अधिकारी गोळ्या देऊन निघून गेला. गृहस्थाने विचार केला “या गोळ्या कुठे ठेऊ, कुठे फेकू? माझ्या घरात लहान मुले आहेत. त्यांच्या हाती गोळ्या लागल्या, तर अनर्थ होईल. बाहेर फेकून देतो” या विचाराने तो बाहेर
गेला पण कुत्रे, कोंबड्या खातील म्हणून तो थांबला. “छपरावर फेकतो” या विचाराने तो छपरावर गेला. परंतु त्याने विचार केला “कावळे, चिमण्या खाऊन मरतील! वाहत्या पाण्यात टाकतो.” म्हणून तो नदीकाठी आला. त्याने विचार केला “या गोळ्यांनी जलचरे मरतील! कुठे टाकू? जीवजंतु नाही अशी जागा कोणती?” शेवटी त्याने विचार केला “जमिनीतच गोळ्या पुरतो.” त्याने जमीन उकरली. परंतु यांतून झुरळे वगैरे निघाली. शेवटचा पर्याय म्हणून त्याने गोळ्या चुलीत जाळून टाकायचे ठरवले. परंतु “गोळ्यांच्या विषारी धूराने हवेतील कीटक मरतील” हा विचार मनात आला. त्या गृहस्थाच्या लक्षात आले की जीवजंतु नाहीत अशी जागाच नाही.” त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला.
गुरुदेव पुढे म्हणाले “एक लक्षात घे. घरातच काय, संपूर्ण विश्वात सुईच्या टोकावरील जागेएवढ्या भागातशुदधा अतिसूक्ष्म जीवजंतू आहेत. ते सूक्ष्मदर्शक यंत्रानेसुद्धा दिसत नाहीत. म्हणजे या उदाहरणावरून सर्व जग प्राणिमात्रांनी व्यापले आहे हे समजते. आणखी असे की
भगवंतांनी स्पष्ट म्हटले आहे “मीच ‘चैतन्य रूपाने सूक्ष्म जंतूंपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक प्राणिमात्रांत आहे.” म्हणजे सर्व जग परमात्म्याने व्यापलेले आहे हेही सिद्ध झाले.
गुरुदेव सांगतात “‘मी चैतन्य आहे’ ही अनुभूती महायोग शक्तिपात साधनेने येते, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हेच रहस्य आहे.” तात्पर्य, संत सांगतात
‘हे विश्वचि माझे घर ।’
……………………..