श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

हा योग युक्तीचा’

शक्तिपात महायोग एक अध्यात्मिक विज्ञान आहे. शक्तिपात महायोग साधनेने साधकाला वेगळ्या प्रकारचे विशेष ज्ञान प्राप्त होते. एक साधक हे वैद्यकीय क्षेत्रात उत्तम निदान करणारे व गुणकारी औषधोपचार करणारे म्हणून सुप्रसिद्ध होते. प्रसंगानुरूप सुसंवादातून रुग्णाचे समाधान करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहू.

एका गावात दोघे भाऊ त्यांच्या पत्नींसह राहत होते. पत्नींमध्ये सलोखा नव्हता, एकमेकींवर द्वेष व राग होता. एकदा त्यातील एक जण वरील वैद्यांकडे येऊन म्हणाली “माझी तब्बेत ठीक नाही.” तिने दीराच्या पत्नीबद्दल खूप तक्रारी केल्या. वैद्यांनी तिचे सर्व म्हणणे
शांतपणे ऐकून घेतले. ते म्हणाले “मी तुमच्या रोगाची चिकित्सा केली आहे. तुम्ही सर्व विसरून मनापासून तुमच्या दीराच्या पत्नीला क्षमा करा. तिच्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करा. हेच तुमच्या रोगावर रामबाण औषध आहे.” महिला म्हणाली “तिला क्षमा करणे मला कधीही शक्य होणार नाही.” वैद्य म्हणाले “मग पृथ्वीवरील व स्वर्गातील सगळ्या वनस्पती व सगळी रसायने घेऊन खुद्द धन्वंतरी जरी तुम्हाला बरे करण्यासाठी आला तरीही तुमचा रोग बरा होणार नाही. आशा सोडा.” ती महिला रागाने घरी निघून गेली.

कालांतराने ती महिला पुन्हा वैद्यांना भेटली. ती म्हणाली “तुमचा उपदेश मला आधी विषासारखा वाटला. पण विचार केल्यावर मला तुमचे म्हणणे पटले. मी मनमोकळेपणाने दीराच्या पत्नीशी बोलले “माझे आजवरचे अन्याय पोटात घे. मला क्षमा कर.” दीराची पत्नी म्हणाली “मीच तुमची माफी मागीतली पाहिजे. सगळे विसरून आजपासून आपण एकमेकांशी बहिणीप्रमाणे वागू या.” महिला वैद्यांना म्हणाली “मी क्षमा मागितल्यापासूनच पूर्ण बरी झाले. आम्ही गुण्यागोविंदाने वागत आहोत.” वैद्यांनी समजावले “तुम्ही बऱ्या झालात ही आनंदाची बाब आहे. खरे म्हणजे तुमच्या मनात दीर्घकाळापासून जे राग, द्वेष होते, तेच तुमच्या रोगाचे कारण होते. कारण दूर होताच त्याचे कार्य अर्थात् रोगही दूर झाला.” ती महिला आनंदाने घरी गेली. वैद्याने ‘हा योग युक्तीचा’ या आधारे रोग बरा केला. हे रहस्य आहे.

सारांश, प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांची “सहकुटुंब सहपरिवार दास आम्हीं हें घरदार” अशी प्रार्थना आहे. कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा ही भगवंताचीच कृपा आहे हे सत्य आहे. तात्पर्य,

‘हा योग युक्तीचा ।’

……………………..

<< जेथे काम तेथे उभा श्याम