सुंदर ते ध्यान
मां आनंदी
प्रत्येक मनुष्य आनंदीच आहे. संत मार्गदर्शन करतात “श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, योगवाणी अशा प्रासादिक ग्रंथातील उपासना, साधना याद्वारे मानवाने आनंद वर्धिष्णु करावा.” तसेच योगेश्वर कपिल महामुनींनी सोपी पद्धत सांगितली आहे. ती म्हणजे “भगवंतांच्या स्मितहास्याकडे पाहा आणि आनंद मिळवा.” जगद्गुरु शंकराचार्यही म्हणतात “परब्रह्म पांडुरंगाचे स्वरूप पाहून आनंद मिळवा.” अर्थात् दोनही महात्म्यांनी ‘सुंदर ते ध्यान’ हा आनंदप्राप्तीचा मार्ग सांगितला. या ध्यानाभ्यासाने मन प्रसन्न राहते.
अनंतनाग जिल्ह्यातील नागदंडी येथील योगाश्रमात ध्यानाभ्यासाविषयी सत्संग चालला होता. या सत्संगात गुरुदेव शिष्यांना सांगत होते “ध्यानाभ्यास हा आनंदाच्या अनुभूतीसाठी आहे. तसेच संतांच्या ग्रंथांच्या अभ्यासाने अनुभूती प्राप्त होते हे सत्य आहे.” शिष्य म्हणतो “मला नाही समजले.” गुरुदेव म्हणतात “ठीक आहे. तुम्हाला एक घडलेला प्रसंग सांगतो. एका गावात ऐंशी वर्षांच्या ‘माँ आनंदी’ म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या उत्साही आणि मृदू भाषी असून सर्वांशी आपुलकीने वागत असत. त्या नित्य भगवद्गीता पठण करीत असत. त्यांच्या ठिकाणी दैवीगुण होते. त्यांच्याकडे पाहून सर्वांना प्रसन्न वाटत असे. तसेच त्याच गावात साठ वर्षांची एक महिला
‘खिन्नवदना’ म्हणून प्रसिद्ध होती कारण ती सदैव खिन्न व दुःखी असे. याचे कारण असे की ती नेहमीच दु:खाचा विचार करीत असे. तिच्याकडे पाहून कोणालाच प्रसन्न वाटत नसे.
एके दिवशी त्या दोघी एकमेकींसमोर आल्या. माँ आनंदींचे सर्वांशी प्रेमळ वागणे पाहून खिन्नवदना म्हणाली “हे काय लहान मुलांसारखे वागणे? या वयाला शोभते का?” असे म्हणून ती निघून गेली. माँ आनंदींनी हे ऐकले परंतु त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.” शिष्य विचारतो “हे कसे काय?” गुरुदेव सांगतात “माँ आनंदी भगवद्गीतेतील भगवंतांचा उपदेश जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करीत असत.” शिष्य म्हणतो “म्हणजे काय?” गुरुदेव सांगतात “भगवद्गीतेतील ‘सुख दुःख समान माना’ या भगवंताच्या वचनाचे अनुसरण त्यांनी केले. त्यामुळे निंदा-स्तुति, सुख-दुःख यात त्या स्थिर राहिल्या व त्यांना परमानंदाच्या अनुभूतिची प्राप्ती झाली.
याच ‘माँ आनंदी’ पुढे संत म्हणून प्रसिद्ध झाल्या. आता समजले का तुला?” शिष्य म्हणतो “होय गुरुदेव. आपल्या उपदेशाप्रमाणे मी अभ्यास करेन.” तो नमस्कार करतो. तात्पर्य,
‘मन की प्रसन्नता यही ईश्वरदर्शन है।’
……………………..