सुंदर ते ध्यान
खरा तो एकची धर्म
एका योगाश्रमात सत्संग चालला होता. गुरुदेव सांगत होते “उत्तम जन्म, उत्तम संस्कार, उत्तम विद्या, उत्तम शक्ती, उत्तम कर्म, उत्तम स्वाध्याय, उत्तम साधना हे सत्त्वगुण एकत्रित आल्यानंतर मनुष्य संतरूपाने जन्माला येतो. असे संत भगवंताशी एकरूप असतात.” शिष्य विचारतो “कसे काय?” गुरुदेव म्हणतात “घडलेला प्रसंग पाहू.
बिहारच्या मांझी जिल्ह्यातील छपरा गावात कायस्थ कुळामध्ये संत धरणीदासांचा जन्म झाला. ते श्रीजगन्नाथांचे परमभक्त होते. त्यांच्या हृदयात ओतप्रोत पराभक्ती होती. कार्यालयीन जबाबदाऱ्याही ते उत्तम रीतीने सांभाळत असत. एकदा कार्यालयात काम करीत असताना अचानक त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. ते
पाणी पिऊ लागले व समोरच्या कागदांवरही पाणी ओतले. अधिकाऱ्याने विचारले “हे काय केले?” श्रीधरणीदास म्हणाले “श्रीजगन्नाथाच्या वस्त्रांना आग लागली. ती शांत केली.” कार्यालयातील सर्वांनी श्रीधरणीदासांचा उपहास केला. परंतु “आता कारकुनी नको, अखंड भगवद्चिंतनातच राहावे” या विचाराने श्रीधरणीदासांनी तत्काळ नोकरी सोडली. त्यांनी ठरवले ‘प्रत्येक क्षणी ईश्वरावर हृदयातून प्रेम करून जीवनाचे सार्थक करेन.” शिष्य विचारतो “मग काय झाले?” गुरुदेव म्हणाले “कालांतराने ‘देवाच्या वस्त्रांना आग लागल्याची’ घटना खरी आहे हे सर्वांना समजले. अधिकाऱ्याने श्रीधरणीदासांची क्षमा मागून नोकरीवर रुजू होण्याची प्रार्थना केली. परंतु श्रीधरणीदासांनी नकार दिला. अधिकाऱ्याने देऊ केलेली आर्थिक मदत व भूमी दानही त्यांनी नाकारले. त्याच गावात एका कुटीत ते राहू लागले. आजही श्रीधरणीदासांचा आश्रम आहे. त्यांचे अनेक अनुयायी आहेत. त्यांचे सत्यप्रकाश, प्रेमप्रकाश हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.”
गुरुदेव शिष्याला वरील घटनेचे रहस्य समजावून सांगतात “श्रीधरणीदासांच्या पराभक्तीचे सामर्थ्य विलक्षण होते. त्यांनी देवाला त्रास होऊ नये म्हणून अग्नीचा दाह स्वतः सहन करून तो निष्प्रभ केला. असे महात्मे देवाला प्रिय असतात.”
गुरुदेव पुढे म्हणतात “अशा थोर भक्तांद्वारे भगवंताची प्रतिष्ठा जगामध्ये होते. त्याप्रमाणे श्रीजगन्नाथाचे महत्त्व श्रीधरणीदासांनी जगासमोर आणले. परमात्माच महात्म्यांच्या रूपात धर्मजागरण, धर्मप्रतिष्ठा, धर्मसंरक्षणाचे महान कार्य करतो.” सारांश, सद्य स्थितीत साधकाने ‘शक्तिपात महायोग’ या ईश्वरी साधनेने पराभक्ती प्राप्त करून घ्यावी. या साधनेने संपूर्ण जीवन प्रेममय बनते हे मर्म आहे.” तात्पर्य,
‘खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे।’
……………………..