सुंदर ते ध्यान
जिकडे पाहू तिकडे देव
शक्तिपात महायोगाचे थोर महात्मा प. प श्रीगंगाधरतीर्थ स्वामिमहाराज होऊन गेले. त्यांनी पहिली शक्तिपात दीक्षा अक्षय्य तृतीयेला दिली. हा दिवस ‘वैश्विक शक्तिपात योग दिन’ म्हणून साजरा होतो.
श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीच्या चंदन तलावाकाठी श्रीगंगाधरतीर्थ स्वामिमहाराजांच्या योगाश्रमात सत्संग सुरू होता. गुरुदेव म्हणाले, “संतांनी भक्त-भक्ती-भगवंत अशी त्रिपुटी सांगितली आहे.” शिष्य विचारतो “म्हणजे काय?” गुरुदेव म्हणतात “काही संत महात्म्यांच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे दिसतात. हे घडलेल्या प्रसंगातून समजावून घेऊ. पुरी जिल्ह्यात महात्मा श्रीबलरामदासजी होऊन गेले. त्यांना जीवनात श्रीचैतन्य महाप्रभुंच्या संगतीचा अपूर्व लाभ मिळाला. श्रीबलरामदास श्रीजगन्नाथाचे परमभक्त होते. त्यांची आत्मनिवेदन भक्ति होती. अन्य विषयांकडे त्यांचे लक्षच नसे. ते देवाला सांगत असत “भगवंता, माझ्यासह परिवार, धन, घरदार सर्वकाही तुझेच आहे. माझे काहीही नाही.”
गुरुदेव म्हणाले “एकदा श्रीबलरामदास श्रीजगन्नाथांच्या चिंतनात मग्न होते. ते देहभान विसरले. त्या अवस्थेत श्रीजगन्नाथाच्या रथयात्रेत ते रथावर चढू लागले. रथावरील सेवकांनी त्यांना प्रतिबंध केला. दु:खी-कष्टी झालेल्या श्रीबलरामदासांनी पुरीतील एका ठिकाणी जाऊन वाळूचा रथ बनवला. त्यांनी आर्ततेने श्रीजगन्नाथांना हाक मारली “भगवंता, मी आजवर तुझी भक्ती केली असेल तर तू या रथामध्ये आले पाहिजेस.” श्रीजगन्नाथ वाळूच्या रथात आरूढ झाले. शिष्य विचारतो “मग काय झाले?” गुरुदेव म्हणाले “तिकडे रथयात्रेच्या ठिकाणी अचानक रथ स्थिर झाला. हजारो भाविकांनी हलविण्याचा अतोनात प्रयत्न करूनही रथ हलला नाही. सर्वजण हताश झाले. मध्यरात्रीला श्रीजगन्नाथपुरीच्या राजाला स्वप्नात श्रीजगन्नाथ म्हणाले “श्रीबलरामदासांच्या वाळूच्या रथात त्यांनी मला प्रेमाने आणून बसवले आहे. माझी रथयात्रा सुरू करण्यासाठी मला आणि श्रीबलरामदासांना सन्मानाने घेऊन या.” भगवंताच्या आज्ञेप्रमाणे राजा सर्व लव्याजम्यासहित श्रीबलरामदासांकडे आले. सर्वांनी क्षमा मागितली. मुख्य स्थानी येऊन श्रीबलरामदासांनी देवाला रथात बसवले. रथ जागेवरून हलला. सर्वांच्या जयघोषात रथयात्रा आनंदात सुरू झाली.”
गुरुदेव समजावून सांगतात “श्रेष्ट आत्मनिवेदन भक्तीबरोबर श्रीबलरामदासांची ओरिया भाषेतील रामायण, महाभारतासह, योग व तत्त्वज्ञानावरील प्रासादिक ग्रंथ संपदाही विशाल आहे. श्रीबलरामदासांची भगवंताशी एकरूपता अर्थात ‘जिव-शिव ऐक्य’ होते. हे आत्मनिवेदन भक्तीचे रहस्य आहे. शक्तिपात महायोग साधनेने ‘मी’, ‘माझे’, ‘मीपण’ संपून साधकाला परमानंदप्राप्ती होते. हे मर्म आहे.”
तात्पर्य,
‘जिकडे पाहू तिकडे देव चहूंकडे।’
……………………..