श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

शक्तिपात महायोगाचे थोर महात्मा श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराजांनी श्रीक्षेत्र देवास व हृषिकेश येथे योगाश्रमाची स्थापना केली. त्यापैकी हृषिकेश येथील आश्रमात सत्संग चालू होता. गुरुदेव म्हणाले “विविध विद्या व तंत्रविद्या असल्या तरी भक्तीमार्गच श्रेष्ट आहे.” शिष्य विचारतो “हे कसे काय?” गुरुदेव म्हणतात “प्रत्यक्ष घडलेला प्रसंग असा.

आसाम प्रांतामध्ये श्रीशंकरदेव होऊन गेले. ते विद्वान पंडित होते. ते योग, तत्वज्ञान व भारतीय प्राचीन वाङमयाचे परिपूर्ण अभ्यासक होते. तसेच श्रीमद्भागवत, गुणमाला, रुक्मिणीहरण हे त्यांचे आसामी भाषेतील ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्यांचा तंत्रविद्येचा अभ्यास होता. परंतु अनेक तीर्थयात्रा करीत ते श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये आले. श्रीजगन्नाथांच्या कृपेने त्यांच्या ठिकाणी आल्हादिनी दिव्य भक्ती प्रकट झाली आणि त्यांना भक्तीमार्गाची ओढ लागली. भक्तिमार्गच श्रेष्ट आहे अशी त्यांची भूमिका तयार झाली. आसाम प्रांतात परत येऊन त्यांनी सर्वांना भक्तीचे माहात्म्य प्रतिपादन केले. श्रीशंकरदेवांची सर्वत्र ख्याती झाली. याच काळात त्यांना श्रीमाधवदेव नावाचे एक परमशिष्य लाभले. या दोघांनी आसाम, ओरिसामध्ये भगवद्भक्ती दृढ केली. आजही श्रीशंकरदेवांचे अनुयायी आहेत.

शिष्य म्हणतो “तंत्रमार्गापेक्षा भक्ती श्रेष्ट हे मला समजले.” गुरुदेव म्हणाले “भक्तांचे महत्त्व भगवंत वाढवतो.” शिष्य विचारतो “ते कसे काय?” गुरुदेव म्हणाले “श्रीजगन्नाथपुरीचे श्रीजगदीश मिश्र नावाचे विद्वान पंडित श्रीजगन्नाथाचे परमभक्त होते. त्यांना एकदा स्वप्नात प्रेरणा मिळाली “आसाम प्रांतातील संत श्रीशंकरदेवांना श्रीमद्भागवत सांगा.” त्या प्रेरणेप्रमाणे श्रीजगदीश मिश्र श्रीशंकरदेवांना श्रीमद्भागवद्कथा सांगू लागले. प्रत्येक दिवशी कथा रंगत चालली होती. एके दिवशी कथा सांगताना श्रीजगदीश मिश्रंना दिव्य अनुभूती आली. त्यांना संत श्रीशंकरदेवांच्या ठिकाणी श्रीजगन्नाथांचे दर्शन झाले. श्रीजगदीश मिश्रंची वाणीच स्तब्ध झाली. त्यांना स्वप्नाचा अर्थ उमगला! डोळ्यातून अश्रू वाहू लागले, “देवा, धन्य झालो” म्हणत त्यांनी श्रीशंकरदेवांना नमस्कार केला. श्रीशंकरदेवांसारख्या थोर भक्तांद्वारे भगवंताचे महात्म्य व भगवद्भक्ती जगामध्ये होते हेच खरे.”

तात्पर्य, भारतातील सर्व संतांनी भक्तीला प्राधान्य दिले आहे हे वास्तव आहे. गुरुदेव पुढे म्हणतात “शक्तिपात महायोग साधनेला भक्तिमार्गात ‘आल्हादिनी दिव्य भक्ति’ म्हणतात. हे रहस्य आहे.”

‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।’

……………………..

स्मरण तुझे मज नित्य असावे >>

<< खरा तो एकची धर्म