सुंदर ते ध्यान
आनंदाचे डोही आनंद तरंग
भारतातील मध्यप्रदेशातील स्वयंभू चामुंडामाता टेकडी हे भारताचे ‘हृदयस्थान’ आहे. या स्थानाजवळ श्रीक्षेत्र देवास येथे शक्तिपातयोगाचे महात्मा श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराज स्थापित विश्वविख्यात ‘श्रीनारायणकुटी’ आश्रम आहे. महात्मा श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराज योगीराज श्रीगुळवणी महाराजांच्या समकालीन होते.
चामुंडामाता टेकडीचा संपूर्ण परिसर अनेक महात्म्यांच्या दीर्घ साधनेने पवित्र आहे. अशा महात्म्यांपैकी योगी श्रीशीलनाथ सिद्धमहात्मा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. ते लहानपणीच घराबाहेर पडले. त्यांची पंजाबमधील महान साधू श्रीइलायचीनाथांशी भेट झाली. बाल श्रीशीलनाथांचा त्यांच्याशी झालेल्या संवादातून मानवी जीवनाचे रहस्य समजावून घेऊ. श्रीइलायचीनाथांनी विचारले “बाळा तू कुठून आलास?” बाल श्रीशीलनाथ म्हणाले “कुठून आलो, कुठे जायचे आहे, काय करावयाचे आहे माहीत नाही. आपण मला उपदेश करावा.” श्रीइलायचीनाथांनी त्यांच्याकडे निरखून पहिले. त्यांनी श्रीशीलनाथांचा उत्कट समर्पण भाव ओळखला व म्हणले “तू योगी आहेस. तुझा भविष्यकाळ तेजस्वी आहे. तू मोठा महात्मा होशील.” श्रीइलायचीनाथांनी त्यांच्यावर कृपा केली. यानंतर श्रीशीलनाथ उत्तराखंडातील जंगलात दीर्घकाळ साधना व मौन आचरणांत आणून साधनसिद्ध महात्मा झाले आणि लोककल्याणाकरिता त्यांनी सर्वत्र पायी भ्रमण केले.
भ्रमण करीतकरीत ते चामुंडामातेच्या टेकडीवर येऊन राहिले. या परमपवित्र परिसरात साधनकुटी आश्रमात सत्संग सुरू होता. सत्संगामध्ये त्यांनी सांगितले “ही चैतन्याची साधना आहे. साधकाला निद्रेतून फक्त शारीरिक विश्रांती प्राप्त होते. साधनेतून उत्तरोत्तर मन-चित्त शांत होते. त्यामुळे साधनेतून मिळणारी विश्रांती श्रेष्ठ आहे. म्हणून दीर्घकाळ, निरंतर साधना करावी हे मर्म आहे.”
साधनसिद्ध महात्मा श्रीशीलनाथांच्या विशेष प्रसंगातून महायोगाचे महत्त्व जाणून घेऊ. श्रीशीलनाथांचे गंगामातेवर आत्मिक प्रेम होते. एके दिवशी प्रदीर्घ साधनेनंतर साधन कुटीतून बाहेर येऊन ते म्हणाले “आज गंगास्नान फार छान झाले.” आश्चर्यचकित होऊन शिष्याने विचारले “महाराज, प्रयाग इथून दूर आहे. आपण इथेच होता. मग गंगास्नान कसे झाले?” श्रीशीलनाथ म्हणाले “प्रत्येकाच्या अंतरात गंगेचा अर्थात् कुंडलिनी शक्तीचा प्रवाह आहे. साधनेतून माझे रोजच गंगास्नान आहे, कोठे जाण्याची आवश्यकताच नाही.” श्रीशीलनाथांनी अधिक स्पष्टीकरण केले “शक्तिपात साधना नियमित न करणे म्हणजे गंगेकाठी उभे राहून गंगास्नान न करण्यासारखे आहे. म्हणून प्रत्येकाने साधनरुपी अंतरगंगेमध्ये स्नान करून आनंद, नित्यानंद, परमानंदप्राप्ती करून घ्यावी.” अशा योगी श्रीशीलनाथांना त्रिवार अभिवादन!
तात्पर्य, संत सांगतात,
‘आनंदाचे डोही आनंद तरंग |’
……………………..