सुंदर ते ध्यान
विश्वासो गुरुवाक्येषु
बंगालच्या ढाक्का शहरातील श्रीढाकेश्वरीमाता मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे पुजारी श्रीचक्रवर्ती यांच्या घराण्यात योगेशचंद्रांचा जन्म झाला. योगेशचंद्र हे पुढे ‘महात्मा श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराज’ म्हणून प्रसिद्ध झाले. श्रीस्वामिमहाराजांनी, योगीराज श्रीगुळवणी महाराजांना शक्तिपात महायोगाची दीक्षा देऊन ही शक्तिपाताची गंगा महाराष्ट्रात आणली. शक्तिपात महायोग हे आध्यात्मिक विज्ञान आहे. हा गीतोक्त मार्ग आहे. योगीराजांनी श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज व श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराज यांच्या स्मरणार्थ ‘श्रीवासुदेव निवास’ या महायोगाचे आद्यपीठ स्थापन केले. योगीराज श्रीगुळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्तमहाराज, योगतपस्वी काकामहाराज या महात्म्यांनी, श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराजप्रणित महायोगाला वैश्विक स्वरूप प्राप्त करून दिले.
शक्तिपात महायोगाचे महात्मा श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराजांच्या हृदयामध्ये सर्व विश्वाविषयी समान प्रेम होते. त्यांच्यावर श्रीढाकेश्वरीमातेची पूर्ण कृपा होती. ईश्वरी कृपा, तीव्र साधना व गुरूसेवेच्या प्रभावाने श्रीस्वामिमहाराजांच्या सभोवतालचे वातावरणही चैतन्यमय असे. या चैतन्यमय सामर्थ्याने अनेक शिष्य दीक्षा घेऊन कृपांकित झाले. अशाच शिष्यांपैकी मुंबईमध्ये एक वत्सराज नावाचे शिष्य होते. भ्रमण करीत करीत श्रीस्वामिमहाराज वत्सराजांकडे मुक्कामाला होते. वत्सराजांना आनंद झाला. वत्सराज श्रीस्वामिमहाराजांच्या सेवेत प्रतिदिन तत्पर असत. तसेच श्रीस्वामिमहाराजांच्या साधनेच्या वेळी वत्सराजसुद्धा साधनारत होते. त्यामुळे वत्सराजांना एम.एच्या परीक्षेचेही विस्मरण झाले. अचानक त्यांना परीक्षेची आठवण झाली. त्यांनी परीक्षा न देण्याचे ठरवले. श्रीस्वामिमहाराजांना हे समजले आणि त्यांचे चित्त द्रवीत झाले. “वत्सराजांनी परीक्षा न दिल्यास त्यांचे नुकसान होईल” हे जाणून श्रीस्वामिमहाराजांनी आज्ञा केली “वत्सराज, परीक्षेला बसा.” आपण न सांगता “श्रीस्वामिमहाराजांना हे कसे समजले?” याचे वत्सराजांना आश्चर्य वाटले. केवळ गुरू-आज्ञा म्हणून वत्सराज परीक्षेला बसले. परीक्षा कक्षात प्रश्न-पत्रिका समोर येताच वत्सराजांनी श्रीस्वामिमहाराजांचे स्मरण केले. त्यांची भावजागृती झाली. गुरुकृपेने वत्सराजांच्या बुद्धीला चालना मिळाली. त्यांना पूर्वी वाचलेले सर्व आठवू लागले. दररोज अशा प्रकारे सर्व पेपर सोडवले गेले. वत्सराज परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि श्रीस्वामिमहाराजांना आनंद झाला.
वरील घडलेल्या प्रसंगाचे रहस्य आपण समजावून घेऊ. यामागे श्रीस्वामिमहाराजांच्या दयावृत्तीतून कार्यशील झालेली चित्तशक्तीच कारणीभूत आहे. गुरू-शिष्यामध्ये एकच चैतन्यशक्ति व्यापलेली असते. त्यामुळे गुरू-शिष्य संबंध दृढ होतात. गुरूंची चित्तशक्ती सर्वसमर्थ असते. समर्पणयुक्त महायोग साधनेतील सातत्य आणि गुरूसेवेने शिष्याच्या अडचणी आपोआप दूर होतात आणि शिष्याची सर्वांगीण प्रगती होते. हेच शक्तिपात महायोगाचे रहस्य आहे.
तात्पर्य,
‘विश्वासो गुरुवाक्येषु ।’
……………………..