सुंदर ते ध्यान
आनंदघन सद्गुरू
श्रीक्षेत्र वाराणसी येथील सिद्धयोग आश्रमात सत्संग सुरू होता. श्रीगुरुदेव सांगतात “मनुष्याचे जीवन प्राण्यांपेक्षा वेगळे आहे. कारण योगसाधना फक्त मानवच करू शकतो प्राणी करू शकत नाही. म्हणून भगवंताच्या कृपेने मानवाला योगसाधनेसाठी जी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे त्याचे सार्थक करणे आवश्यक आहे.”
श्रीगुरुदेव पुढे म्हणाले “भगवंताने प्रत्येक मनुष्याला ‘त्रिकरण’ म्हणजे ‘तीन साधने’ दिली आहेत. ‘त्रि’ म्हणजे ‘तीन’, ‘करण’ म्हणजे ‘साधन’. शरीर, वाणी, मन हे ‘त्रिकरण’ म्हणजेच तीन साधने आहेत. ही साधने व्यवस्थित असणे म्हणजे शरीर सुधृढ असणे, वाणी प्रेमळ असणे, मनामध्ये चांगले संकल्प असणे होय. ही तीन साधने मनुष्याच्या ताब्यात असलीच पाहिजेत अन्यथा त्याला शांतता व समाधान मिळत नाही. शिष्य विचारतो “म्हणजे काय?” श्रीगुरुदेव म्हणतात “एका उदाहरणाद्वारे हा विषय समजावून घेऊ. मनुष्य वाहनाने प्रवास करतो तेव्हा ते वाहन मनुष्याच्या ताब्यात असले तरच तो मुक्कामी सुखरूप पोहोचेल ना?” शिष्य म्हणतो “होय
गुरुदेव.” गुरुदेव म्हणतात “वाहन हे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला जाण्याचे साधन आहे ना?” शिष्य म्हणतो “हो.” गुरुदेव पुढे सांगतात, “त्याचप्रमाणे शरीर, वाचा, मन ही साधने आहेत. यांच्या अर्थात् ‘त्रिकरणांच्या’ शुद्धीमुळे बुद्धीची निर्णयशक्ति वाढते व मानवाला परमानंदाची प्राप्ती होते.”
श्रीगुरुदेव म्हणतात “हा विषय आपण एका उदहरणातून समजावून घेऊ. एक रथ आहे, रथाबरोबर रथी, सारथी, घोडे आहेत. तसेच सारथीच्या हातामध्ये घोड्यांचा लगाम आहे. याचा अर्थ असा की ‘रथ’ म्हणजे ‘मानवी शरीर’, ‘रथी’ म्हणजे ‘रथाचा मालक’ अर्थात् ‘जीवात्मा’ होय, ‘सारथी’ म्हणजे ‘बुद्धी’ होय, ‘घोडे’ म्हणजे ‘इंद्रिये’ होय आणि ‘लगाम’ म्हणजेच ‘मन’ होय. ज्याप्रमाणे सारथी आपल्या हातात लगाम घट्ट धरून रथाला व रथीला मुक्कामाला सुखरूप पोहोचवतो. त्याप्रमाणे बुदधिरूपी सारथी मनरुपी लगामांनी इंद्रियरूपी घोड्यांना नियंत्रित ठेवतो आणि रथीला म्हणजेच जीवात्म्याला परमानंदाची प्राप्ति करून देतो. हे समजले का तुला?” शिष्य म्हणतो “गुरुदेव, होय हे मला समजले. पण हे कसे साध्य करावे? याकरिता आपण उपदेश करावा.” गुरुदेव म्हणतात, “साधकाने श्रीसद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे श्रद्धायुक्त नित्य महायोग साधना करणे आवश्यक आहे. यामुळे परमानंदाची प्राप्ती होते, हे सत्य आहे.”
संत सांगतात,
‘साधावया निज ज्ञान | आनंदघन सद्गुरू |’
……………………..