श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

करविसी तू, वदविसी तू

स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्याबद्दल सांगतात “माझे सद्गुरू रामकृष्ण परमहंस हे आद्य शं‍कराचार्यांच्यासारखे विलक्षण बुद्धिमत्ता असलेले आणि चैतन्य महाप्रभुंसारखे विशाल व प्रेमळ हृदयाचे होते. त्यांच्या हृदयात जगातील प्रत्येकासाठी ओलावा होता म्हणून ते विश्ववंद्य आहेत.”

अशा परमशिष्य स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातील प्रेरणादायी प्रसंग असा. स्वामींचा जन्म कलकत्त्यातील श्रेष्ठ घराण्यात झाला. कालांतराने प्रतिकूल प्रसंगांमुळे त्यांना कठीण परिस्थितीतून कालक्रमणा करावी लागली. त्यावेळी मित्र परिवाराने अनेक प्रकारे सहकार्य केले. काही कालावधी रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात घालवल्याने कठीण परिस्थितीतसुद्धा स्वामी विवेकानंदांचा भगवंतावरील विश्वास कायम होता. त्यांची नियमितपणे उपासना चालूच होती. “साधनेच्या पुढील मार्गदर्शनासाठी रामकृष्ण परमहंसांचे मार्गदर्शन घ्यावे” असा विचार येताच ‘रामकृष्ण परमहंस कलकत्त्यात आहेत’ असे स्वामी विवेकानंदांना समजले. गुरुभेटीची तळमळ वाढली. दोघांची भेट झाली. स्वामी विवेकानंदांना घेऊन रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वरीच्या सान्निध्यातील आपल्या निवासस्थानी आले. वात्सल्याने स्वामी विवेकानंदांकडे पाहत रामकृष्ण परमहंसांनी मार्गदर्शन केले “आपला जन्म परमात्मप्राप्तीसाठीच आहे. हे लक्षात ठेऊन आता आश्रमातच आपले वास्तव्य
ठेवा.” आनंदाने स्वामी विवेकानंद “हो” म्हणाले. कालांतराने आश्रमात राहून स्वामी विवेकानंद धैर्याने साधनेत आणि समर्पणयुक्त गुरुसेवेत रममाण झाले. रामकृष्ण परमहंसांनाही समाधान वाटले.

एके दिवशी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्याजवळ प्रार्थना केली “माझ्या उन्नतीसाठी आशीर्वाद द्यावा.” रामकृष्ण परमहंसांनी उपदेश केला “जगन्माता दक्षिणेश्वरीला प्रार्थना करा.” स्वामी विवेकानंद उत्साहाने मंदिरात गेले. मातेच्यासमोर येताच तिचे तेज पाहून त्यांना काय बोलावे सुचलेच नाही. त्यांनी रामकृष्ण परमहंसांना काय घडले ते सांगितले. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करण्यासाठी पाठवले. परंतु तेच घडले. स्वामी विवेकानंद तिसऱ्यांदा मंदिरात गेले. त्यांच्या ठिकाणी तीव्र संवेग निर्माण झाला. त्यामुळे साधनेची गती तीव्र झाली, चित्तशक्ती क्रियाशील झाली आणि मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले. ते असे “हे आई, मला फक्त ज्ञान आणि वैराग्य दे!” स्वामी विवेकानंदांना विलक्षण तेज प्राप्त झाले होते. त्यांनी रामकृष्ण परमहंसांना सर्व सांगितले. रामकृष्ण परमहंस म्हणतात “ही भगवतीचीच कृपा आहे हे रहस्य आहे.”

पुढे गुरुदेवांच्या आणि जगन्मातेच्या आशीर्वादाने स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण राष्ट्र एकसंघ करण्याचे महान कार्य करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हे सत्य आहे.

संत सांगतात,

‘करविसी तू, वदविसी तू, तू जगन्माते ।’

……………………..

स्मरणमात्रे होय ज्ञानप्राप्ती >> 

<< साधनेसी जो सिद्ध तो सर्वश्रेष्ठ