श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

मन करा रे प्रसन्न

महर्षि पतंजलि सांगतात “यशस्वी जीवनासाठी ‘मनाची प्रसन्नता’ हे महत्त्वाचे सूत्र आहे. यामध्ये चार उपाय आहेत- मैत्री, करुणा, हर्ष आणि उपेक्षा.” याचा अर्थ असा- “सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. दीन अनाथांच्याविषयी दया असावी. नेहमी आनंदी असावे. मनाविरुद्ध होण्याऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे.” यामुळे मनाची प्रसन्नता साधते. मनुष्य नेहमी हसतमुख राहतो.’

पतंजलि मुनींच्या या सूत्राचे रहस्य प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून समजावून घेऊ. एका गावात शुद्ध आयुर्वेद शास्त्रात निष्णात वैद्यराज राहत होते. ते उत्तम साधकही होते. ते नेहमी प्रसन्न, हसतमुख असत. म्हणून त्यांच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न व शांत असे. वैद्यराजांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटत असे. त्यांच्याकडे पाहून ‘वैद्य प्रत्यक्ष नारायणच आहे’ ही साक्ष प्रत्येकाला येत असे.

एकदा गावातील एक गृहस्थ आजारी पडला. त्याने वैद्यराजांना घरी बोलावले. वैद्यराज आले, गृहस्थाजवळ बसले आणि म्हणाले “काय होत आहे, मला सांगा.” गृहस्थ सांगू लागला. वैद्यराज प्रसन्न चित्ताने त्याच्याकडे पाहत त्याचे सर्व ऐकत होते. वैद्यराजांनी हसतमुखाने बोलताबोलता त्या गृहस्थाला आश्वासित केले. ते म्हणाले “हे बघ, तू नियमितपणे औषध घेणारा आहेस. असे निराश होऊ नये. “मी आजारी आहे” हा विचार तू सोडून दे. तू बराच आहेस. तुझा आत्मविश्वास वाढव.” वैद्यराजांच्या वाणीचा, उत्साहाचा, प्रसन्नतेचा परिणाम गृहस्थावर झाला. त्याला “आपण बरे झालो” अशी खात्री झाली. आनंदाने तो वैद्यराजांना म्हणतो, “अहो वैद्यराज, मी बरा झालो. कृपया हे कसे ते मला सांगा?”

वैद्यराज समजावतात “सद्गुरूंकडून मला उत्तम साधना प्राप्त झाली आहे. ती मी नियमित दीर्घकाळ करतो. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की माझा सर्व व्यवहार प्रामाणिक आणि समर्पित आहे. यामुळे माझ्यातील ‘मीपणा’ कमी झाला. म्हणून माझा स्वभाव प्रसन्न व हसतमुख आहे. मी तुझ्याशी बोलत राहिलो. त्यामुळे तुझ्यातील नैराश्य दूर झाले. तू बरा झालास. हे रहस्य आहे.” गृहस्थाने वैद्यराजांचे आभार मानले. सर्वांचा निरोप घेऊन वैद्यराज निघून गेले. सर्वांना आनंद झाला.

तात्पर्य, कोणतेही क्षेत्र असो. त्या क्षेत्रात आणि आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सद्गुरूंकडून प्राप्त साधना नियमित करणे आणि व्यवहारशुद्धी ठेवणे हेच मनाच्या प्रसन्नतेचे मर्म आहे. संत सांगतात

‘मन करा रे प्रसन्न।’

……………………..

स्मरणभक्ती श्रेष्ठ >>

<< श्रीगुरु: शरणम्