श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

स्मरणभक्ती श्रेष्ठ

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराज सांगतात “एकंदरीत नऊ प्रकारच्या भक्ती आहेत. त्यामध्ये स्मरणभक्ती सर्वश्रेष्ठ आहे.” स्मरण म्हणजे ‘अनुभवलेल्या विषयांचे ज्ञान’ होय. आपण एखाद्या देवतेची उपासना करतो. त्या उपासनेमध्ये त्या देवतेचा आपण जप करतो. पण आपण हा जप सर्वकाळ करू शकत नाही. तो खंडित होतो. परंतु स्मरण हे सर्वकाळ असते. स्मरण कधीही खंडित होत नाही. म्हणून स्मरणभक्ती श्रेष्ठ मानली आहे. स्मरण हे अखंडित राहण्यासाठी साधकाची साधना समृद्ध असणे आवश्यक आहे. हे रहस्य आहे.

महात्मा श्रीरामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी सुबोधानंद होते. ‘स्मरणभक्तीचा’ विषय स्वामी सुबोधानंदांच्या चरित्रातून समजावून घेऊ. स्वामी सुबोधानंद हे एक उत्तम साधक होते. त्यांची साधना-उपासना श्रेष्ठ होती. एकदा स्वामी सुबोधानंद हरिद्वारला आले. येथे त्यांनी एका योगाश्रमात वास्तव्य केले. अचानक ते आजारी पडतात. त्यांच्या अंगात त्राण राहिला नव्हता. ते अगतिक झाले होते. या अवस्थेत त्यांना पाणी पिता येईना. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला “आपण एकटे आहोत, काय करावे? शिवाय आपल्याजवळ पैसेही नाहीत.” कालांतराने ते निद्राधीन झाले. स्वप्नामध्ये त्यांना स्वामी श्रीरामकृष्ण परमहंसांचे ‘दर्शन’ झाले. स्वामी सुबोधानंद एकदम जागे झाले. स्वामी श्रीरामकृष्णांच्या दर्शनाने ते आश्वासित झाले. ते विचार करतात “मी एकटा कुठे आहे? सद्गुरू तर माझ्याचबरोबर आहेत.” त्यांना आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक आश्रमात त्यांच्याकडे एक साधू आले. साधू म्हणतात “मला तुमची सेवा करायची आहे.” स्वामी सुबोधानंद म्हणतात “मला कुणाचीही सेवा नको.” ते साधू जाताच दुसरे साधू येऊन म्हणतात “मला आपल्याला आर्थिक मदत करावयाची आहे.” स्वामी सुबोधानंद सांगतात “अहो साधू महाराज, मला कोणाकडूनही सेवा अथवा आर्थिक मदत नको आहे. माझे गुरुदेवच माझ्या बरोबर आहेत असा माझा ठाम विश्वास आहे.” हे ऐकून दुसरे साधूही निघून जातात.

स्वामी सुबोधानंद म्हणतात “माझ्याकडून साधना व गुरुस्मरण खंडीत झाले म्हणूनच “मी एकटा आहे, माझ्याजवळ पैसे नाहीत” असा विचार माझ्या मनात आला. वस्तुतः गुरुदेव सदैव आपली काळजी घेतात. हेच सत्य आहे.” स्वामी सुबोधानंदांनी श्रीगुरुदेवांची क्षमा मागितली. ते नित्य साधनेमध्ये रममाण झाले.

संत सांगतात

‘स्मरणभक्ति श्रेष्ठ।’

……………………..

तेणे सुखी राही सर्वकाळ  >>

<< मन करा रे प्रसन्न