श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

तेणे सुखी राहू सर्वकाळ

मध्यप्रदेशमधील श्रीक्षेत्र देवास येथील नारायण कुटी आश्रमामध्ये सत्संग होता. महात्मा श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराज सांगतात “जग परिवर्तनशील आहे. परिवर्तन म्हणजे बदल होय. जगातील प्रत्येक जड आणि अजड म्हणजे सजीवांमध्ये बदल होतो. जड-अजडामध्ये असलेल्या शक्तीमुळेच हे परिवर्तन होते. हे रहस्य आहे.”
श्रीस्वामिमहाराज जडामध्ये परिवर्तन कसे होते ते उदाहरणाने समजावून सांगतात “रुई हा पदार्थ आहे. त्यापासून कापूस होतो. कापसापासून दोरा तयार होतो. चार पाच दोरे एकत्र करून दोरखंड तयार होतो. दोऱ्याच्या उभ्या आडव्या धाग्यांनी जे तयार होते त्याला वस्त्र म्हणतात. रुईपासून वस्त्रापर्यंत बदल झाला. तसेच त्या वस्तूचे नाव आणि रूप बदलले. याचप्रमाणे सजीवांमध्ये बदल होतो. उदाहरणार्थ, काळानुरूप पशू-पक्षी, मनुष्य यांच्या आकारामध्ये, दिसण्यामध्ये बदल होतो. जडामधील आणि सजीवांमधील हे दोन बदल आपण पाहिले. हे दोनही बदल वरवर दिसणारे आहेत.”

श्रीस्वामिमहाराज पुढे सांगतात “महायोग साधना अंतःशुद्धीचा मार्ग आहे. साधना दैनंदिन, श्रद्धा, समर्पण भावनेने होऊ द्यावी. त्यामुळे साधकातील चेतना शक्तीमुळे अंतर्बाह्य परिवर्तन होते. उदाहरणार्थ राग जाऊन शांतता येते, लोभ नष्ट होऊन उदारता येते, अहंकार नष्ट होऊन नम्रता येते. हे परिवर्तन श्रेष्ठ व चिरकाल टिकणारे आहे. हे सत्य आहे.”

अशा प्रकारचे परिवर्तन प्रत्यक्ष घडलेल्या दोन प्रसंगातून समजावून घेऊ. काही महिन्यांपूर्वी दोन साधकांना दीक्षा झाली. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात पाहू. एका कार्यालयामध्ये उच्च पदावर असलेले पहिले साधक, अभिजीत, सांगतात “गुरुदेव, मला दिक्षेचे कृपादान झाल्याने जीवनाचे सार्थक झाले. विशेष म्हणजे कार्यालयामध्ये अनेक जण विविध निवेदने घेऊन येतात. ते आग्रही असतात. पूर्वी मला राग अनावर होत असे. परंतु आता मला शांतता प्राप्त झाल्याने मी आनंदाने हसतमुखाने त्यांचे स्वागत करतो. ही कृपा आहे.” तसेच कोल्हापूर जवळील सातवे खेड्यात राहणारे दुसरे साधक, पाटील, सांगतात “गुरुदेवा, आपणाकडून दिक्षा मिळाली, आनंद झाला. आमचे कुटुंब शेतकरी आहे. शेतामध्ये कष्ट करूनही आम्ही थकत नाही. आमच्यामध्ये आहार, विचार, यामध्येही खूप बदल झाला. ही गुरुकृपाच आहे.”

तात्पर्य, महायोग साधनेने अंतर्बाह्य परिवर्तन होते हे मर्म आहे. संत सांगतात,

‘तेणे सुखी राहू सर्वकाळ|

……………………..

भेटीलागी जीवा >>

<< स्मरणभक्ती श्रेष्ठ