श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

भेटीलगी जीवा

देवभूमी केरळमधील आनंदाश्रमामध्ये सत्संग होता. महात्मा श्रीनिजानंद स्वामिमहाराज सांगतात “संपूर्ण जगामध्ये परमात्मा आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेतील कणाकणांत भरपूर गोडी भरली आहे त्याचप्रमाणें विश्वांतील प्रत्येक लहान मोठ्या वस्तूत परमात्मा भरून राहिलेला आहे.”

हे ऐकून शिष्य म्हणाला “परमात्मा सर्वत्र भरून राहिला आहे. पण इतके वर्षे सेवा करूनही मला अजूनही परमात्म्याचे दर्शन झाले नाही. मला देवाचे दर्शन करवून द्या.” प्रथमतः श्रीस्वामिमहाराज शांत राहिले. एके दिवशी शिष्याने हट्टच धरला. म्हणून श्रीस्वामिमहाराज म्हणाले “चल माझ्याबरोबर नदीवर. तुला परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवतो. पण लक्षात घे, तुझी तेवढी तयारी पाहिजे.” शिष्य आनंदित झाला. दोघे नदीकाठी आले आणि पाण्यात उतरले. श्रीस्वामिमहाराज म्हणाले “तू पाण्यात बुडी मार.” शिष्याने बुडी मारली. पाण्याखाली जाताच कासावीस होऊन शिष्य बाहेर आला. पुन्हा श्रीस्वामिमहाराजांनी बुडी मारण्यास सांगितले. पुन्हा कासावीस होऊन शिष्य बाहेर आला. तो घाबरला, आश्रमात पळून गेला आणि गुपचूप बसून राहिला.

शिष्याच्या पाठोपाठ श्रीस्वामिमहाराजही आले. त्यांनी शिष्याला विचारले “परमेश्वराचे दर्शन हवे होते ना, मग धावत परत का आलास?” शिष्य म्हणाला “मला पाण्याची भीती वाटली, अधिक वेळ पाण्यात राहवेना.” श्रीस्वामिमहाराज विचारतात “पाण्यातून वर येताना काय वाटले?” शिष्य म्हणाला “गुरुदेव, मी अस्वस्थ झालो, कधी पाण्यातून बाहेर येतो आणि श्वास घेतो असे झाले होते मला.” श्रीस्वामिमहाराज विचारतात “मग काय केलेस?” शिष्य म्हणाला “सर्व शक्तीनिशी मी उसळी मारून वर आलो. मी थरथरत होतो तरी जीव वाचवण्यासाठी मी धावलो.”

श्रीस्वामिमहाराज स्पष्टीकरण करतात “कुणाच्याही मदतीशिवाय तू पाण्यातून बाहेर आलास आणि आश्रमाकडे धावत गेलास. ही तुझी जीव वाचविण्याची ओढ व तळमळ होती. ज्यावेळी भगवंताविषयी तुझ्या हृदयांत अशीच ओढ व तळमळ निर्माण होईल तेव्हा तो तुला आपोआपच भेटेल.” शिष्य म्हणाला “मी काय करावे?” श्रीस्वामिमहाराज सांगतात “अशी ओढ निर्माण होण्यासाठी तुला एक साधना सांगतो. ती तू कर.” त्याप्रमाणे शिष्य निरंतर, श्रद्धायुक्त, समर्पण भावनेने बराच काळ साधनेत रममाण झाला. अनेक वर्षांनी एके दिवशी साधनेमध्येच शिष्याला प्रकाशरूप परमात्म्याचे दर्शन झाले. तो अतिशय आनंदित झाला.

संत सांगतात,

‘भेटीलागी जीवा ।’

……………………..

तितिक्षा >>

<< तेणे सुखी राही सर्वकाळ