श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

वंदावी पाऊले

केरळमधील महात्मा नित्यानंदांच्या आश्रमात सत्संग होता. महात्मा श्रीस्वामिमहाराज सांगतात “भारतीय प्राचीन भाषातज्ज्ञ म्हणतात ‘मनुष्य ज्या शब्दांचा उच्चार करतो त्यावरून बोलणाऱ्याचा स्वभाव कळतो. तसेच बोलणाऱ्याने उच्चारलेल्या शब्दांचा आणि वाक्यांचा परिणाम ऐकणाऱ्यावर होतो.’ उदाहरणार्थ, एखादा शब्द ऐकू नये असा असेल तर ऐकणारा कानावर हाथ ठैवतो. त्याचबरोबर आनंदकारक बोलणे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मुखावर हास्य येते. विशेषतः मनुष्याच्या बोलण्यावरून त्याच्या अंतरात कोणत्या प्रकारचे विचार चालले आहेत याचा बोध होतो. हे संतश्रेष्ठ माऊली सुंदर रीतीने समजावून सांगतात. ते असे – “मानस जाणिजे
बोले।” या ओवीचा अर्थ असा– फुलावरून झाड ओळखता येते, एखाद्याच्या बोलण्यावरून मन ओळखता येते. एखादा वक्ता आहे. त्याचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व उत्तमच असते. पण सर्वांच्या मनात राहते ते ‘वक्तव्य’. म्हणून संतश्रेष्ठ माऊली म्हणतात ‘बोलण्यावरून बोलणाऱ्याच्या हृदयाची कल्पना येते’.

हा विषय प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगांतून समजावून घेऊ. तो असा- एकदा वनवासात प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ऋष्यमूक नावाच्या पर्वतावर फिरत होते. त्यांना पाहून वानरांचा राजा श्रीसुग्रीव श्रीहनुमंतांना म्हणतात “हे मारुतीराया, ते दोघे कोण आहेत पाहून या.” भिक्षुकाचा वेष घेऊन श्रीहनुमंत श्रीरामचंद्रांच्याकडे आले. दोघांमध्ये जणू काही सद्गुरू-साधक संवाद झाला. श्रीरामचंद्र श्रीहनुमंतांची स्तुति करतात. श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात “‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असे मारुतिरायांचे बोलणे हृदयातून आहे.” त्याचबरोबर श्रीहनुमंत श्रीसुग्रीवांपाशी येऊन म्हणतात “हे सुग्रीवा, आपल्या सांगण्यानुसार मी जाऊन आलो. ते अयोध्येचे राजे प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांचे बंधू लक्ष्मण आहेत, जगाच्या संरक्षणासाठीच अवतरले आहेत.” श्रीसुग्रीवांनी मारुतीरायांचे म्हणणे मान्य केले.

तसेच दुसरे उदाहरण पाहू. युद्धापूर्वी लंकाधिपती रावणाचा भाऊ बिभीषण श्रीरामचंद्रांच्याकडे आले. त्यावेळी वानर सेना म्हणते “हे प्रभो, याच्यावर विश्वास ठेऊ नका.” परंतु बिभीषणाचे बोलणे ऐकून मारुतीराय स्पष्टपणे सांगतात “बिभीषण विश्वासपात्र आहेत. ते हृदयातून बोलत आहेत. त्यांना सख्य करण्याची इच्छा आहे.” प्रभू श्रीरामचंद्रांनी मारुतीरायांचे म्हणणे ग्राह्य धरले.

वरील दोनही उदाहरणांवरून मनुष्याच्या बोलण्यावरून त्याच्या अंतरात कोणत्या प्रकारचे विचार आहेत हे समजते. हेच संतश्रष्ठ माऊलींच्या ‘मानस जाणिजे बोले ।’ या ओवीचे रहस्य आहे.

अर्थात्

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ।’

……………………..

संत हेच देव >>

<< तितिक्षा