श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

सेवाभाव

श्रीऋषभदेव मोठे तत्त्ववेत्ते आणि महान योगी होते. योगी श्रीऋषभदेव सांगतात “ ‘महत्सेवाम् द्वारम्’ अर्थात् थोर सत्पुरुषांची सेवा हे मुक्तीधाम म्हणजेच परमानंदाची प्राप्ती होय.” सेवाभाव महत्त्वाचा आहे. ‘सेवा’ म्हणजे समर्पण होय. सेवेमुळे अहंकार दूर होतो आणि ईश्वरावरील भक्ती दृढ होते. म्हणून ‘सेवा’ हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे. अशा सेवेने संतांचे अर्थात् श्रीभगवंतांचे अखंड आशीर्वाद प्राप्त होतात, हे सत्य आहे.

सेवेचे महत्त्व रामायणातील एका प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून समजावून घेऊ. सेतुबंधनाचे कार्य जोमाने सुरू होते. त्यावेळी एक छोटीशी खार आपले अंग पाण्यात भिजवत होती. मग ती वाळूत लोळत होती. काही वाळूचे कण तिच्या अंगाला चिकटले. ती धावत सेतू बंधनाच्या कामाच्या ठिकाणी आली. इथे मोठाल्या दगडांच्या सपाटीत तिने आपले अंग झटकले. त्यामुळे पाठीला चिकटलेले वाळूचे कण त्यात पडले. पुन्हा अंग भिजवणे, वाळूत लोळणे, दगडांच्या सपाटीत अंगावरील वाळूचे कण झटकणे अशा सतत धावपळीत ती होती. “सेतुबंधनाच्या कार्यात मीपण सेवा करणार” अशी तिची भावना होती. इतक्यात तिला पाहून एका वानराने तिला हिणवले “अगं खारूताई, बाजूला हो. इथे मोठमोठे वानर काम करीत आहेत. त्यांच्या पायाखाली चिरडली जाशील.”

खार समुद्राच्या तीरावर जाऊन रडत बसली. योगायोगाने प्रभू श्रीरामचंद्र तेथे आले. त्यांनी तिला पाहिले. तिच्याजवळ येऊन प्रभू श्रीरामचंद्र विचारतात “अगं खारूताई, का रडतेस?” खार म्हणाली “मी माझ्या पाठीवरून वाळूचे कण घेऊन पुलावर टाकत होते.” भगवंत म्हणाले “हो, माझे लक्ष होते तुझ्याकडे, मी पाहिली तुझी धावपळ.” “आपल्याला सेवा करतांना भगवंतांनी पाहिले” याचा खारीला आनंद झाला. तिने वानराबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. खारीला जवळ घेऊन, पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले “तुला जी सेवा करायची आहे ती तू कर. पाठीवरून वाळूचे कण नेऊन सेतुबंधनात मदत केलीस, म्हणून माझ्या अखंड आशीर्वादाची खूण तुझ्या पाठीवर कायम राहील.” भगवंतांच्या तीन बोटांच्या पेरांच्या खुणा प्रत्येक खारीच्या पाठीवर आपण आजही पाहतो.

निष्काम सेवा श्रीभगवंतांना आणि संतांना प्रिय आहे. हे रहस्य आहे.
‘तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा ।
सामर्थ्याने देवा पायांपाशी ।।’

……………………..

परमानंदाचा त्रिवेणी संगम >>

<< संत हेच देव