श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

पायां पडे जन ऐकमेका

श्रीमद्भगवद्गीतेत श्रीभगवंत सांगतात “सिद्धानां कपिलो मुनि:। म्हणजे सर्व सिद्ध महात्म्यांमध्ये कपिल महामुनि माझाच अवतार आहे.” सांख्यतत्वज्ञ योगेश्वर कपिल महामुनि हे ऋषभदेव आणि माता देवहुती यांचे सुपुत्र होत. कपिल महामुनींनी संपूर्ण विश्वाला परमात्म तत्त्वाचे ज्ञान दिले. त्यामध्ये योगेश्वर कपिल महामुनींनी योगमार्ग, सांख्ययोग, सृष्टी उत्पत्तीचे रहस्य आणि भक्तियोगाचे मर्म या विषयांचे विस्तृत वर्णन केले आहे. हा योगेश्वर कपिल महामुनि-माता देवहुती संवाद म्हणजेच ‘कपिल-गीता’ होय.

योगेश्वर कपिल महामुनि भक्तियोगाचे मर्म सांगतात. ते असे – “सुंदर ते ध्यान करा, आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्या.” माता देवहुतीला परमेश्वराचे ध्यान कसे करावे हे समजावून सांगतांना योगेश्वर कपिल महामुनि म्हणतात “मस्तकापासून पायांपर्यंत आणि पायापासून मस्तकापर्यंत श्रीभगवंताच्या रूपाकडे पाहत राहावे आणि ते आपल्या हृदयात साठवावे. हे रूप पाहता पाहता चित्त एकाग्र होते.” योगेश्वर कपिल महामुनी पुढे सांगतात “हे माते, श्रीभगवंतांच्या मुखावरील स्मितहास्याकडे पाहून तेथे ध्यान एकाग्र करावे. या ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे हृदय श्रीभगवंतांच्या प्रेमाने भरून येते आणि तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. त्याचे जीवन
आनंदमय होते.”

योगेश्वर कपिल महामुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे माता देवहुतींनी योगाभ्यासासह भक्तिमार्गाचा अवलंब केला. तिला श्रीभगवंतांची प्राप्ती झाली. ज्या ठिकाणी योगेश्वर कपिल महामुनींनी माता देवहुतींना उपदेश केला ते स्थान म्हणजे श्रीक्षेत्र सिद्धपूर अर्थात् मातृगया म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान कपिल महामुनींनी अध्यात्म योगाचे गूढ रहस्य सांगितले आहे ते अलौकिक आणि दिव्य अनुभूती देणारे आहे हेच खरे. कालांतराने कपिल महामुनींनी सिद्धपूर येथील आश्रमातून भारताच्या ईशान्य दिशेला अर्थात् गंगा आणि समुद्र मिळतात त्या गंगासागराकडे प्रस्थान केले. तेथे समुद्राने त्यांचे स्वागत करून त्यांना स्थान दिले. या ठिकाणी सर्व विश्वामध्ये शांतता नांदावी यासाठी योगेश्वर कपिल यांचा आजही येथे निवास आहे. हे सत्य आहे. अशा योगेश्वर कपिल महामुनींना आपण त्रिवार अभिवादन करू या!

सारांश, योगेश्वर कपिल महामुनींनी भक्तियोगाचे जे सार सांगितले ते असे – “भगवंत सर्वांमध्ये आहेत. म्हणून प्रत्येकाला मनोभावे नमस्कार करावा.”

संत सांगतात

‘पंढरीसी नाही कोणा अभिमान । पायां पडे जन ऐकमेका ।’

……………………..

<< परमानंदाचा त्रिवेणीसंगम 

पसायदान >>