श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

पसायदान

सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींची ‘श्रीज्ञानेश्वरी’ हा प्रासादिक ग्रंथ संपूर्ण जगाला लाभला. ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीनंतर श्रीमऊली विश्वात्मक परमेश्वराकडे मागणे मागतात. ते म्हणजे श्रीज्ञानेश्वरी इतकेच महत्त्वाचे असे पसायदान होय. यामध्ये “विश्वात्मक परमात्म्याने प्रसन्न व्हावे आणि पसायदान द्यावे” अशी प्रार्थना श्रीमाऊली करतात. पसायदानामधून श्रीमऊलींनी स्वतःकरीता काहीही मागितलेले नाही. त्यांनी ‘विश्वकल्याण’ मागितले आहे. हे भारताचे वैभव आहे. “विश्वातील प्रत्येकाच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्या आणि त्यांना परमानंदाचीही प्राप्ती व्हावी” हेच श्रीमऊलींचे मागणे आहे.

भारतीय ऋषी, मुनि, संतांनी देवाजवळ “सर्वांना आत्मानंदाचे सुख प्राप्त व्हावे” असेच मागणे मागितले आहे. प्रत्येकाचे जीवन समृद्ध असावे. ही समृद्धी म्हणजे आत्मानंद सुखाची प्राप्ती होय. संतांनी भौतिक सुखाच्या मागे न लागता, संपूर्ण भारतात पायी भ्रमण करून अध्यात्म मार्गाचा प्रचार केला. प्रथमत: जगद्गुरू शं‍कराचार्यांनी भारत भ्रमण करून अद्वैत धर्माची स्थापना केली आणि संपूर्ण भारत एकसंघ केला. त्याचप्रमाणे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांनी आसेतु हिमाचल तीन वेळा पायी भ्रमण करून श्रीगुरुदत्तयोग प्रस्थापित केला. तसेच श्रीलोकनाथतीर्थ स्वामिमहाराजांनी ढाकावरून (बांग्लादेश) संपूर्ण भारतात पायी प्रवास करून ‘शक्तिपात महायोग’ सर्वांसाठी सुलभ केला. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पायी भ्रमण करून संपूर्ण भारतात शांतता प्रस्थापित केली. रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेने स्वामी विवेकानंदांनीही एकही पैसा जवळ न बाळगता विश्व कल्याणासाठी भारतभर पायी भ्रमण केले. कोणी तिकीट काढून दिले तरच गाडीने प्रवास, नाहीतर पायीच! याप्रमाणे अनेक संतांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीच कार्य केले हे मर्म आहे.

या सर्व भारतीय ऋषी, मुनि, संतांनी राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र दिला. त्यांची विचार धारा आणि त्यांची दिव्य वाङ्मयसंपदा हे ‘सुंदर ते ध्यान’ या लेखमालेचे अंतरंग आहे. या लेखमालेला श्रीवासुदेव निवास पीठस्थ देवता, श्रीस्वामिमहाराज आणि श्रीमहाराज यांचे कृपाशीर्वाद प्राप्त झाले आहेत. म्हणूनच सर्वांसाठी ‘सुंदर ते ध्यान’ हे एक पाथेय आहे. ही सर्व लेखमाला त्यांच्याच चरणी अर्पण आहे.

श्रीमाऊलींच्या चरणी नमस्कार करून त्यांच्याच शब्दात मागणे मागू

‘भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ।।’

……………………..

<< आनंद