दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीवासुदेव निवास मध्ये भक्ती, उपासना आणि कुंडलिनी शक्तिपात महायोग या दोन्ही धारांचा अव्दितीय संगम झालेला आहे. कुंडलिनी शक्तिपात महायोग विद्येचे मूळपीठ म्हणून श्रीवासुदेव ख्यातकिर्त आहेच, सोबत श्रीदत्तसंप्रदायाचे भारतातील एक प्रमुख उपासना केंद्र म्हणूनही श्रीवासुदेव निवास सुप्रसिध्द आहे.
योगीराज प. पू. श्रीगुळवणी महाराजांच्या मातोश्री उमाबाई यांना भगवान श्रीदत्तात्रेयांनी यतीरुपात दर्शन देऊन त्यांना चांदीच्या पादुका प्रसादरूपाने दिल्या आहेत. त्याच पादुका श्रीवासुदेव निवास मध्ये अधिष्ठित आहेत. या रूपात भगवान श्रीदत्तात्रय श्रीवासुदेव निवास मध्ये विराजमान आहेत. दररोज सकाळी पूजनाच्या वेळी प्रसादपादुकांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळतो.
श्रीगुळवणी महाराजांची कुलदेवता श्रीतुळजाभवानीचेही अधिष्ठान श्रीवासुदेव निवास मध्ये आहे. आदिमाया श्रीतुळजाभवानीच्या स्वरुपात आदिशक्ती भगवती कुंडलिनी माता आणि भगवान श्रीदत्तात्रेयांच्या रूपात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या परमदेवतांचे अधिष्ठान असल्याने श्रीवासुदेव निवास लहान ग्रामापासून ते विदेशातील भक्तांसाठी एक पावन तीर्थक्षेत्र बनले आहे.
दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि शक्तीपाताचार्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीलोकनाथ तीर्थस्वामी महाराज तसेच योगीराज श्रीवामनराव गुळवणी महाराज, ब्रह्मश्री श्रीदत्तमहाराज कवीश्वर, योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज श्रीवासुदेव निवास मध्ये प्रत्यक्ष विराजमान असून त्यांचे अखंड कृपाछत्र आपल्यावर आहे ही भावना इथे येणाऱ्या आर्त भक्तांंच्या मनामध्ये तयार होते.
श्रीवासुदेव निवासच्या स्थापनेवेळी योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी आखून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे काटेकोरपणे इथे सर्व उत्सव, उपासना संपन्न होतात. वर्षभर विविध प्रयोजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञयाग श्रीवासुदेव निवास मध्ये संपन्न होतात. श्रीगुरुचरित्र पारायणे, श्रीमद्भा्गवत कथा सप्ताह, शेकडों भक्तांचा सहभाग असलेले सामुहिक श्रीसत्यदत्तपूजन, हजारो भक्तांचा सहभाग असलेले श्रीविष्णूसहस्त्रनाम पठण, प्रमुख उत्सव तथा पर्वणी मध्ये अखंड नामजप असे विविध उपक्रम श्रीवासुदेव निवासमध्ये सुरु असतात. या निमित्तांंनी देश विदेशातील भक्तांचा अखंड ओघ श्रीवासुदेव निवास मध्ये वर्षभर वाहात असतो.
श्री वासुदेव निवास मधील दिनचर्या
प्रातःकाळी
पवमान, रुद्र,अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुषसुक्त यांचा देवांना अभिषेक, पूजा
देवदर्शन : सकाळी ७ ते रात्री ९
दुपारी १२ –३० ते १.०
वैश्वदेव, महानैवेद्य
सायंकाळी ४ ते ५.३०
भजन (सोमवार, गुरुवार)
सायंकाळी ७.३० ते ८.०
आरती व करुणात्रिपदी
सर्व आरत्यांसह,
(प्रत्येक वाराची आरती)
महिन्यातील प्रत्येक रविवारी
सामुदायिक साधना
सकाळी ८ ते ९
सत्संग सकाळी ९ ते १०
प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आणि रविवारी निवासी महायोग साधना शिबीर
श्रीवासुदेव निवासच्या स्थापनेमागची भूमिका
परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीवामनराव गुळवणी महाराज हे दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरुष होते. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने त्यांचा जन्म मातोश्री सौ. उमाबाई आणि पिताश्री पं. दत्तंभटजी या दत्तोपासक दांपत्याच्या पोटी दि. २३ डिसेंबर १८८६ रोजी कुडूत्री जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची दत्तोपासना होती. प. पू. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांचे सदगुरू प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी चौदाशे किलोमीटर प्रवास केला, त्यातील तब्बल सातशे किलोमीटर प्रवास पायी केला. शेवटी कर्नाटकातील हावनुर येथे त्यांचे दर्शन झाले. याच भेटीत श्रीस्वामी महाराजांनी त्यांना मंत्रोपदेश केला आणि स्वतःमध्ये व्याघ्रांबरधारी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडविले. प. पू. श्रीगुळवणी महाराज चित्रकार होते, त्यांना झालेल्या दर्शनाचे तैलचित्र त्यांनी तयार केले जे आजही श्रीवासुदेव निवास मध्ये देवघरात विराजमान आहे. श्रीस्वामीमहाराजांच्यानंतर पू. श्री गुरुमहाराजांची योगसाधना व महायोगाची जिज्ञासा पाहून प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. दत्तभक्ती आणि महायोग अर्थात शक्तिपातविद्या यांचा अपूर्व संगम सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज यांच्या जीवनात झाला आहे. आर्त, मुमुक्षु भक्तांच्या अंतिम कल्याणासाठी भक्तीमार्ग आणि शक्तिपात मार्ग या दोन्हींच्या प्रसारासाठी योगीराजांनी संपूर्ण जीवनभर दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले.
ते पुण्यात ‘२० नारायण पेठ’ गोवईकर वाड्यात भाड्याच्या दोन खोल्यात राहात होते. त्यांचा कार्याचा किर्तीसुगंध संपूर्ण भारतभर पसरला होताच, भक्तांची अखंड वर्दळ त्यांच्या घरी असे. तिथेच परंपरेचे सर्व उत्सव, कार्यक्रम साजरे केले जात असत. कार्याचा वाढता पसारा पाहून एखादा आश्रम स्थापन करावा असा विचार भक्तजनांनी श्रीमहाराजांकडे मांडला. संपूर्ण आयुष्य सन्यस्त वृत्तीने व्यतीत करणारे श्रीमहाराज हे सुरुवातीला आश्रम स्थापनेच्या विरोधातच होते.
१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटल्यामुळे पुण्यात प्रचंड पुर आला, या महाप्रलयात अर्धेअधिक पुणे पाण्याखाली गेले. श्रीमहाराज राहात असलेला गोवईकर वाडासुद्धा पुराच्या भक्ष्यस्थानी पडला. श्रीमहाराजांचे राहते घर पाण्यात बुडाले. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची हस्तलिखित वाड्मय संपदा पुराच्या पाण्यात भिजली. परंपरेचे कार्य समर्थपणे पुढे नेण्यासाठी स्वतंत्र आश्रम असायला हवा या विचाराला महापुराच्या या घटनेने पुन्हा बळकटी मिळाली आणि श्री महाराजांनीही त्याला अनुमोदन दिले.
नियोजित आश्रमाचे नाव ‘श्री वासुदेव निवास’ असे ठरविण्यात आले. ‘श्री वासुदेव निवास’ या नावामागे श्रीगुळवणीमहाराजांनी आपली भूमिका या प्रमाणे स्पष्ट केली:
बहूनां जन्मनामन्ते ज्ञान वान्मां प्रप द्ध्यते
वासुदेव: सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ:
पुष्कळ जन्मांच्या शेवटी तत्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी ‘सर्व काही वासुदेवच आहे’ अशा प्रकारे मला भजत असतो. तो महात्मा अति दुर्लभ आहे, असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात. सगळी नावे त्यांचीच आहेत. लोकनाथ हे नाव त्यांचेच आहे. तरी त्यांनी आपल्या मुखाने वासुदेव नावाला महत्व दिले आहे.
सर्व बांधकाम पूर्ण होऊन आश्रमाची वास्तूशांत व आश्रमप्रवेशाचा दिवस ठरवण्यात आला तो म्हणजे पौष वद्य १०, २७ जाने १९६५ बुधवार / अनुराधा नक्षत्र / अमृत सिद्धीयोग वेळ सकाळी ९.२३. या सुमुहूर्तावर आश्रमप्रवेश होऊन वास्तूचा अर्पण समारंभ झाला.