श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

हेचि दान दे गा देवा

श्रीमद्भगवद्गीतेत श्रीभगवान म्हणतात “अनेक जन्मानंतर प्राप्त झालेल्या मनुष्य जन्मात ‘सर्व काही परमात्माच आहे’ अशी श्रद्धा ठेऊन जो मला शरण येतो तो महात्मा होय.” अशा एका महात्म्याचे चरित्र पाहू.

अलाहबाद (प्रयागराज) येथील कडा गावात महात्मा श्रीमलूकदास होऊन गेले. लहानपणापासूनच ते योगी होते. योगाभ्यास आणि श्रीजगन्नाथाच्या भक्तीत ते रमलेले असत. ‘सर्व काही परमात्माच आहे’ या उन्मनी अवस्थेत असल्याने ते व्यापारात रमले नाहीत. पिताश्रींची इच्छा म्हणून श्रीमलूकदास घोंगड्या विकत असत. परंतु घोंगड्या दान करण्यामध्येच श्रीमलूकदासांना आनंद होता. ध्याता-ध्येय-ध्यान हेच ज्यांचे सूत्र होते अशा श्रीमलूकदासांच्या जीवनात एक घटना घडली. एकदा घोंगडी विकत घेणारा, दान घेणारा कोणीही आला नाही. अचानक एक तेजस्वी मजूर त्यांच्याजवळ येऊन म्हणाला “अहो मलूकदास, हे घोंगडीचे गाठोडे मी तुमच्या घरी पोहोचवतो.” घोंगड्या मजूराकडे देऊन श्रीमलूकदास भजन करीत घरी निघाले. मजूर वेगाने घरी पोहोचला. मजूराला एकटाच आलेला पाहून श्रीमलूकदासांच्या आईला शंका आली “याने घोंगडी काढून घेतली का?” तिने मजूराला खोलीत बसवून भोजन वाढले व खोलीचे दार लावले.

श्रीमलूकदास येताच आई म्हणाली “मजूराला एकटे सोडायचे नसते. घोंगड्या मोजून घे. मजूराला खोलीत बंद केले आहे.” महात्म्यांना वाईट वाटले. ते खोलीचे दार उघडून पाहतात तर खोली रिकामी, फक्त पोळीचा एक तुकडा होता! श्रीमलूकदास म्हणाले “आई, हे मजूर नव्हते, प्रत्यक्ष श्रीजगन्नाथच होते. त्यांनी तुला दर्शन दिले!” दोघांनी आनंदाने पोळीचा तुकडा प्रसादरूपाने ग्रहण केला. योगी श्रीमलूकदास आईला म्हणाले “श्रीजगन्नाथाचे दर्शन झाल्याखेरीज मी बाहेर येणार नाही.” अशा निश्चयाने त्यांनी ध्यानाला प्रारंभ केला. याप्रमाणे तीन दिवसांनी श्रीमलूकदासांना लख्ख प्रकाशात श्रीजगन्नाथांनी दर्शन दिले. आनंदित होऊन श्रीमलूकदासांनी मागणे मागितले “जगन्नाथा, तुझ्याजवळ मला स्थान दे.” त्यांच्या प्रार्थनेनुसार आजही श्रीजगन्नाथपुरीमध्ये श्रीजगन्नाथाला छप्पन प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य (भोग) दिला जातो. त्यांमध्ये प्रसादरूपाने श्रीमलूकदासांच्या पदार्थांचा समावेश आहे. अशा महात्म्यास त्रिवार अभिवादन.

तात्पर्य, ध्यान करणारा ‘ध्याता’ आणि ज्याचे ध्यान करतो ते ‘ध्येय’ म्हणजे भगवंत या त्रिसुत्रीमुळे श्रीमलूकदास श्रीजगन्नाथांच्या नित्य सानिध्यात राहिले. “असा महात्मा दुर्लभ आहे” हे भगवंताच्या उद्गारांचे रहस्य आहे.

संत सांगतात,

‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा।।’

……………………..

आनंद  >>

<< विश्वासो गुरुवाक्येषु