Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
मैत्री
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंत ‘मैत्रः करुण:|’ “मित्रभाव व दयाळू असणारा मला प्रिय आहे” असें स्पष्टपणे सांगतात. ‘मैत्रीत’ स्वाभाविक करुणाभाव, दयाळूपणा असतोच. म्हणून भगवान् बुद्धांनी “यशस्वी जीवनासाठी मैत्री-करुणा” सांगितली आहे. तसेंच पतंजलि मुनींनी “मैत्री-करुणा चित्तप्रसन्नतेचे मुख्य सूत्र आहे” असें वर्णन केले आहे. यावरून ‘मैत्री-करुणेचे’ अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होते.
‘मैत्री’ म्हणजे ‘स्नेहभाव’ ‘सख्यभाव’ होय. हा भाव अबाधित व संशयरहित असण्याचे महत्त्व घडलेल्या प्रसंगातून पाहूं. दोन मित्र असतात. एक व्यक्ति एका मित्राच्या कानात “कांहीं नाहीं” असें सांगते. दूसऱ्या मित्राने विचारले, “काय सांगितले?” पहिला म्हणतो, “कांहीं नाहीं.” असें खरें सांगूनही दुसर्याच्या मनातील “हा खोटे बोलत आहे” अशा संशयामुळेंच दोघांच्या ‘मैत्रीत’ दुरावा येतो. प्रेमभाव कायम राहण्यासाठी ‘वादविवाद टाळणें, आर्थिक व्यवहार न करणें आणि संशयास्पद कानगोष्टी न करणें’ ही त्रिसूत्री लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
समान आवड असलेल्यांमध्ये ‘मैत्री’ जुळते, जशी हरिणाची हरिणांशी, गाईची गाईंबरोबर, बुद्धिमंतांची बुद्धिमंतांबरोबर. म्हणून “सज्जनमैत्री साधावी” असें शास्त्रकार सांगतात. हें उदाहरणांनी समजावून घेऊं. समुद्र परिपूर्ण आहे. चंद्र त्याचा मित्र असून पौर्णिमेच्या चंद्रामुळे समुद्राला भरती येते. तसेंच ऊसाच्या रसाची गोडी शेंड्यातून प्रत्येक पेऱ्यात क्रमाने वाढत जाते. म्हणून स्नेहशील स्वभाव असलेल्या सज्जनांची ‘मैत्री’ अधिकाधिक वाढत जाऊन आनंद मिळतो.
‘मी’ हा अहंकार दूर करतो’ तो ‘मित्र’. माता, पिता, ‘मित्र’ स्वभावत:च मानवाचे हितचिंतक असून ‘मित्र’ निःस्वार्थी, विश्वासू, डोळ्यांना सुखावणारे प्रीतिरूप अमृत होय. ते मनाला आनंद देतात, हितकारक गोष्टींचेच मार्गदर्शन करतात, गुप्तता राखून केवळ सद्गुणच प्रकट करतात व संकटात बरोबर राहून मदत करतात. एक उदाहरण असें. कोकिळ आम्रवृक्षावर मित्रासारखे प्रेम करतो. वृक्षाला फळे आली नाहींत, तर कोकिळ मलूल होऊन विरहाने झुरतो. आंब्याचे स्मरण करीत तो आंब्याचाच वृक्ष शोधीत राहतो परंतु इतर कोणत्याही फळांकडे धाव घेत नाहीं. सारांश, ‘मित्र नाहीं तर सुख नाहीं’ हें प्रेरणादायी आहे. म्हणून आजच्या काळांत भगवंताचा ‘मैत्री-करुणाविषयीचा’ संदेश प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीत आणून आनंदी राहावे.
श्रीज्ञानेश्वरमाऊली पसायदानातून तात्पर्य सांगतात-
‘भूतां परस्परे जडो,
मैत्र जिवांचे||”
……………………..