सुंदर ते ध्यान
परस्परे पडो मैत्र जीवांचे
‘महायोग साधना तेजस्वी आहे’ हे पाहिले. महायोग साधक साधनेने व सेवेने गुरुशक्तिशी एकरूप होतो. त्याला स्वतःमध्ये व अन्य सर्व साधकांत एकाच गुरुशक्तीचा अनुभव येतो. एकमेकांमध्ये बंधुत्वाची भावना बळकट होते. हे एका प्रसंगातून समजावून घेऊ.
योगिराज श्रीगुळवणी महाराज केदारनाथ-बद्रिकेदार यात्रेला गेले. ते केदारनाथचा डोंगर चढत होते. समोर एक संन्यासी डोंगर उतरत होते. त्यांना पाहून योगिराजांना त्यांच्याबद्दल विलक्षण आत्मीयता वाटू लागली. दोघे एकमेकांजवळ येऊ लागले. एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढत होते. संकोचामुळे दोघे तसेच पुढे निघाले. परंतु दोघांचे विचारांचे चक्र तीव्र झाले. पावले अडखळली. योगिराजांनी थांबून मागे वळून पाहिले. संन्यासीही त्यांच्याकडे पहात होते. दृष्टादृष्ट होताच एकमेकांशी “आपण स्वामी विष्णुतीर्थ महाराज!” “आपण गुळवणी महाराज!” असा आपोआप परिचय झाला.
याचे रहस्य असे की महायोग-शक्तिपात परंपरेमध्ये बंगालचे थोर महात्मे स्वामी श्रीनारायणतीर्थ होऊन गेले. श्रीक्षेत्र देवासचे पिठाधीश श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराज व योगिराज श्रीगुळवणी महाराज गुरुबंधु होते. श्रीनारायणतीर्थ स्वामींकडून प्रवर्तित गुरुशक्ति दोघांमध्ये कार्यशील होती. म्हणून एकमेकांसमोर येताच श्रीविष्णुतीर्थ स्वामिमहाराजांना व योगिराज श्रीगुळवणी महाराजांना परस्परांमध्ये स्वशक्तीचेच दर्शन घडले. वस्तुतः दोघे पूर्वी भेटले नव्हते. तरीही पहिल्या भेटीतच आपोआप परिचय झाला.
ही अनुभूति महायोग साधनेची उच्च आध्यात्मिक अवस्था आहे. महायोग साधनेतील उच्च स्थितीप्राप्तीच्या प्रकारांमध्ये एक अवस्था ‘परिचय अवस्था’ होय. या अवस्थेतच गुरुशक्तीचा परिचय होतो अर्थात् ‘स्वत:मधील व अन्य साधकांतील चैतन्यशक्ती एकच आहे’ हा अनुभव येतो. विशेष म्हणजे ‘परिचयावस्थे’शिवाय गुरुबंधु असूनही, शक्तीच्या ऐक्यतेचा, आत्मीयतेचा अनुभव होणार नाही.
सामान्यत: मानवामध्ये कोणत्यातरी प्रसंगामुळे, अन्य व्यक्तीने ओळख करून दिल्यानेच परिचय होतो. परंतु कोणताही पूर्वविचार किंवा कारण नसतांनाही सूक्ष्म स्तरावरून, श्रीविष्णुतीर्थ महाराज व योगिराज श्रीगुळवणी महाराजांना एकाच गुरुशक्तिच्या प्रवाहाचा अनुभव आला. हे अतिशय महत्त्वाचे आहे. यातून हे सिद्ध होते की दोघा महापुरुषांमध्ये एकाच क्रियाशक्तीचे सूक्ष्म स्तर होते. त्यांचा संबंध आंतरिक म्हणजे ‘गुरुशक्ति’च्या सूक्ष्म स्तरावरून होता.
वस्तुतः गुरुशक्तीच ‘गुरुतत्त्व’ आहे. गुरुशक्ति विश्व-कल्याणासाठी कार्यरत असते. प्रत्येक साधकाने साधना, सेवा याने चित्त-निर्मलता संपादन करून गुरुशक्तिशी एकरूपता साधली पाहिजे. तात्पर्य, साधक हा उच्च आध्यात्मिक भूमिकेपर्यंत पोहचतो व एकमेकांमध्ये बंधुत्व प्रस्थापित होते. हे सत्य आहे. संतश्रेष्ठ म्हणतात –
परस्परे पडो मैत्र जिवांचे
……………………..