श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

परमानंदाचा त्रिवेणी संगम

भारतीय ऋषि, मुनि, संतांच्या लक्षात आले की विश्व अनंत आहे, अनंतरूपाने विस्तारलेले आहे. ही सर्व एकाच शक्तीची लीला आहे. अनंत ब्रह्मांडात भरून राहिलेल्या शक्तीचा अंश मानवी शरीरात म्हणजे पिंडातही आहे. ‘मानवातील शक्ती आणि ब्रह्मांडातील शक्ती ही एकच आहे’ हे अनुभवणे म्हणजेच पिंड-ब्रह्मांडाचे ऐक्य अर्थात् ‘योग’ होय. त्यामुळे विश्वरूपातील सारी रहस्ये समजतात. याबाबत प्राचीन ऋषी, मुनी, संतांनी सिद्धांत मांडले. हे सिद्धांत आपण ऐकतो, वाचतो, परंतु अनुभव महत्त्वाचा. एकमेवाद्वितीय थोर असे प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांनी ‘योगसाधनेद्वारे आपल्या शरीरातील व ब्रह्मांडातील शक्ती एकच आहे’ म्हणजे ‘स्वतःच्याच ठिकाणी परमानंदाची प्राप्ती होते’ हे अनुभवातून दाखवून दिले.

साक्षात् श्रीदत्तप्रभूंचाच अवतार असलेले श्रीस्वामिमहाराज यांचे चरित्र दिव्य आहे. श्रीस्वामिमहाराजांचे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर स्वामित्व होते. विश्वकल्याणासाठी श्रीस्वामिमहाराजांनी दिव्य अनुभव देणारा ‘श्रीगुरूदत्तयोग’ प्रस्थापित केला. तसेच श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेनेच निर्माण झालेली वाङ्मयसंपदा प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंची वाङ्मयमूर्तीच आहे. यातील एकेक ग्रंथ, एकेक स्तोत्र, एकेक श्लोक परमानंदाची प्राप्ती करून देणारा आहे. ही प्रासादिक वाङ्मयसंपदा भारताचे वैभव आहे.

हे श्रीस्वामिमहाराजांच्या चरित्रातील प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून समजावून घेऊ. विश्ववंद्य श्रीस्वामिमहाराजांचे दीर्घकाळ आशीर्वाद लाभलेले एकमेव परमशिष्य म्हणजे योगिराज श्रीगुळवणी महाराज होत. कर्नाटकातील श्रीक्षेत्र हावनूर येथे श्रीस्वामिमहाराजांचा मुक्काम होता. त्यावेळी श्रीगुळवणी महाराज श्रीस्वामिमहाराजांच्या सेवेत होते. पुढे काही दिवसांनी श्रीगुळवणी महाराज घरी जाण्यास निघाले. त्यावेळी श्रीचरणांस वंदन करून त्यांनी विचारले “या चरणांचे दर्शन केव्हा?” तेव्हा श्रीस्वामिमहाराजांनी स्वतःकडे बोट दाखवून जे रूप दाखविले ते व्याघ्रांबरधारी एकमुखी श्रीदत्तप्रभु’ होत. योगिराज श्रीगुळवणी महाराजांनी हे चित्र रेखाटले. ते ‘श्रीवासुदेव निवास, पुणे’ येथे नित्यपूजनात आहे.

योगिराज श्रीगुळवणी महाराजांनी ‘श्रीगुरुदत्तयोग व शक्तिपातयोग’ यांचे आद्यशक्तिपीठ अर्थात् ‘श्रीवासुदेव निवास’ची स्थापना केली. या परमपवित्र वास्तूमध्ये श्रीदत्तप्रभूंच्याकडून प्राप्त ‘प्रसाद पादुका’, ‘व्याघ्रांबरधारी श्रीदत्तप्रभूंची प्रतिमा’, श्रीदत्तप्रभूंची वाङ्मयमूर्ती अर्थात् समग्र वाङ्मय हा त्रिवेणी संगम आहे. आजही येथे येणाऱ्या प्रत्येक सश्रद्धाला परमानंदाची प्राप्ती होते. हे सत्य आहे.

श्रीस्वामिमहाराजांचा विश्वशांति मंत्र असा –

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।’

……………………..

<< सेवाभाव