सुंदर ते ध्यान
साधनेसी जो सिद्ध, तो सर्वश्रेष्ठ
श्रीक्षेत्र शृंगेरी येथे श्रीश्रीविधुशेखरभारती यांचा सत्संग सुरू होता. ते सांगतात “आश्रमाच्या पवित्र वातावरणाचा, सत्संगाचा प्रभाव मानवी मनावर होतो. त्यामुळे साधकाचा उत्साह वाढतो. या उत्साहामुळे साधक ठरवतो “मी लवकरात लवकर साधना पूर्ण करणार आहे.” प्रत्यक्षात असे होत नाही कारण घरी गेल्यावर साधकाचा उत्साह कमी होतो आणि तो सर्वकाही विसरून जातो.”
यासाठी श्रीश्रीस्वामीजी मार्गदर्शन करतात “साधकासाठी साधनेचा कालावधी भरपूर व साधना दररोज होणे महत्त्वाचे आहे. एक उदाहरण पाहू. समजा रेल्वेने एके ठिकाणी जाण्यासाठी ५ तास लागतात. पण “मी अर्ध्या तासातच जाणार” असे वाटले तरी कालावधी ५ तासाचाच राहतो. याचा अर्थ धैर्याने वाट पाहणे आवश्यक आहे हेच खरे.” श्रीश्रीस्वामीजी पुढे म्हणतात “दुसरे असे की साधनेचे फळ काय मिळेल याची काळजी करूच नये कारण फळाच्या आशेने साधना व्हावी तशी होत नाही. फल देण्याचा अधिकार परमात्म्याचाच आहे.” म्हणून श्रीश्रीस्वामीजी प्रेमाने सांगतात “साधनेचा आरंभ करणे, ती दररोज दीर्घकाळ होणे एवढेच साधकाच्या हाती आहे हे महत्त्वाचे आहे.”
श्रीश्रीस्वामीजी मानवी जीवनाचे सूत्र स्पष्ट करतात. ते असे- “मनुष्याला प्रपंच आहे, त्यामुळे व्यवहारही आहे. व्यवहार सोडून साधक २४ तास साधना करू शकत नाही. म्हणून साधनेच्या वेळी साधनाच केली पाहिजे आणि व्यवहाराच्या वेळी व्यवहारच केला पाहिजे. व्यवहार करतेवेळी मनात सतत असा विचार आला की “मी व्यवहारात गुंतलो आहे. साधना कधी करणार?” तर व्यवहार नीट होत नाही. तसेच साधक साधनेला बसतो तेव्हा ‘पैश्याची देवाण घेवाण’ यावर विचार करीत राहतो. यामुळे काय होते? साधना होत नाही.
निष्कर्ष असा की व्यवहाराच्या वेळी उत्कृष्टपणे व्यवहार सांभाळावा. साधनेच्या वेळी उत्कृष्टपणे साधना होऊ द्यावी. त्यासाठी साधनेच्या आरंभी “मी आता उत्साहाने जास्तीत जास्त वेळ फक्त साधनेलाच बसणार आहे” असा दृढ संकल्प करून साधनेला प्रारंभ केल्याने व्यावहारिक विचार नष्ट होतात आणि मन शांत होते.
श्रीश्रीस्वामीजी श्रीभगवंताने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे रहस्य स्पष्ट करतात. ते असे- “भगवंताने मनुष्यजन्म केवळ कल्याण करून घेण्यासाठीच दिला आहे. ज्याअर्थी मनुष्य शरीर दिले आहे, त्याअर्थी तो परमानंदास पात्र आहे हेच सत्य आहे.”
संत सांगतात,
‘साधनेसी जो सिद्ध, तो सर्वश्रेष्ठ ।’
……………………..