श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

बोलणे नकोच फक्त करणे हवे

“‘मौन’ ही सुंदर ध्यानाची अवस्था आहे” असे संतश्रेष्ठ रमण महर्षि म्हणतात. दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये अरुणाचल आहे. येथे श्रीरमण महर्षींचा आश्रम आहे. श्रीरमण महर्षि अनेक वर्षे मौन धारण करणारे थोर महात्मा होते. मौनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून ते सांगतात  “मौन म्हणजे परमात्म्याच्या नामाचे मनाने केलेले चिंतन होय.” त्यांनी प्रत्येक प्रसंगी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिले. श्रीरमण महर्षि हे ईश्वर अवतारच होते.

श्रीरमण महर्षींच्याप्रमाणे राष्टपिता महात्मा गांधीही आठवड्यातून एक दिवस ‘मौनव्रत’ धारण करीत असत. या मौनव्रताच्या सामर्थ्यावर त्यांनी शांतता प्राप्त केली. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमापासून दांडी गावापर्यंत ३८५ किलोमीटरची २४ दिवसांची पायी यात्रा केली. या यात्रेमध्ये हजारो भारतीय शांततेने सहभागी झाले. या ‘मिठाच्या सत्याग्रहा’द्वारे त्यांनी भारतीयांना जागृत करून ब्रिटीशांना नमवले.

दुसरा महत्त्वाचा प्रसंग असा: एकदा सन १९४२मध्ये डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद यांनी श्रीरमण महर्षींच्या आश्रमाला भेट दिली. त्यावेळी राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी करीत होते. बाबूजींनी श्रीरमण महर्षींना विचारले “महात्मा गांधी मौन करीत आहेत. दुसरीकडे भाषणे, आंदोलने चालू आहेत. याबद्दल आपल्याला काय वाटते?” महर्षि म्हणाले “राष्टपिता महात्मा गांधींचे मौनच श्रेष्ठ आहे. त्यात विलक्षण सामर्थ्य आहे. त्यापुढे सर्व भाषणे, आंदोलने कमी आहेत!” महर्षींचा आश्रम सोडताना बाबूजींनी विचारले “महात्मा गांधीसाठी काही संदेश आहे काय?” श्रीरमण महर्षि तत्काल म्हणाले “माझ्यामध्ये आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यामध्ये ‘शब्देविण संवादिजे’ आहे. म्हणजे आमचे अंतःकरण एकच आहे. त्यामुळे बोलण्याचा विषयच रहात नाही. मग वेगळा संदेश काय देणार?” हे ऐकताच डॉ. राजेंद्रप्रसादांना आनंद झाला. सर्व अनुयायांना डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद म्हणाले “मौन व्रत धारण करणाऱ्या या दोन महात्म्यांचे सामर्थ्य विलक्षण आहे. ब्रिटिशांच्या राज्यातून भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित आहे.” कालांतराने ब्रिटिशांनी महात्मा गांधींच्या व रमण महर्षींच्या मौनाचे सामर्थ्य ओळखले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले.

सद्य स्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्रीरमण महर्षि व महात्मा गांधी हे मोठे आदर्श आहेत. आपण सर्वांनी त्यांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे. तात्पर्य, ‘मौन’ ही ध्यानाची अवस्था’ आहे. संत म्हणतात-

‘बोलणे नकोच फक्त करणे हवे |’

……………………..

पिंडी ते ब्रह्मांडी >>

<< इतरांस सुखी करावे