सुंदर ते ध्यान
‘बुद्धीचे लेणे | ईश्वराचे देणे
महायोग शक्तिपात एक आध्यात्मिक विज्ञान आहे. ऋषि, मुनि, संत, महात्म्यांच्या प्रासादिक ग्रंथसंपदेमुळे भारतभूमि ही ज्ञानभूमि आहे. यालाच भारतीय ज्ञानसाधना म्हणतात. महायोग शक्तिपात साधनेमुळे प्रासादिक ग्रंथातील अर्थात् वेद, उपनिषदातील तसेच स्मृति ग्रंथातील रहस्ये आपोआप अवगत होतात. हे साधन सिद्ध महात्मा श्रीअनंतप्रभूंच्या चरित्रातून पाहू या.
परमहंस श्रीअनंतप्रभु मोठे महात्मा होऊन गेले. ते १३९ वर्षांचे होते. त्यांच्या ठिकाणी योगाभ्यास, विद्वत्ता व पराभक्ती यांचा संगम होता. त्यांची बुद्धी व स्मरणशक्ती अत्यंत तेजस्वी होती. श्रीमद्भागवताचे १८ हजार श्लोक व अनेक ग्रंथ केवळ तोंडपाठच नव्हते तर त्या ग्रंथांचे परिपूर्ण ज्ञानही त्यांना होते. तसेच वेद वेदान्त शास्त्रातील सिद्धांतांची अनुभूतिही त्यांनी प्राप्त केली. याचा परिणाम असा की कर्म, भक्ति, ज्ञान, योग या विषयांवरील त्यांचा सत्संग प्रासादिक असे. त्यामुळे उपस्थित साधक, भक्तांना सर्व सिद्धांतांची गूढरहस्ये आपोआप समजत असत व परमानंदाची प्राप्ती होत असे कारण सद्गुरु व साधक या दोघांमधील शक्ति जागृतीचे साधन समानच होते.
श्रीअनंतप्रभूंच्या चरित्रातील वैशिष्ट्य असे की त्यांच्या आश्रमात अनेक पशु-पक्षी निर्भय होऊन स्वच्छंदपणे विहार करीत असत. “सर्वांशी प्रेमाने वागणारा, अहिंसा व्रताचे पालन करणारा भक्त मला आवडतो” ही भगवद्गीतेतील भगवंतांची वाणी सार्थ करणारे हे महात्मा होते. हे स्पष्ट होते. परमहंसांची ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण होती. तसेच त्यांनी आहार व निद्रेवर विजय प्राप्त केला होता. दिवसभरात ६ कप दूध आणि काही तासांचीच निद्रा असे. तरीही त्यांचे शरीर बलिष्ठ होते. नियमित दीर्घकाळ ‘चैतन्याच्या साधनेमुळे’ त्यांच्या शरीराची कांती तेजस्वी होती. प्रसन्नता, मुखावरील हास्य व बालभाव पाहून सर्व साधक भक्तांना संतश्रेष्ठ रामकृष्ण परमहंसांचे स्मरण होत असे.
श्रीअनंतप्रभूंना सर्व सिद्धी अवगत होत्या. त्याचा उपयोग त्यांनी कधीही केला नाही. सर्व प्रांतातील योगाभ्यासकांना ते मौलिक उपदेश करीत असत “हे बंधूंनो, सिद्धी मानवाला भगवंतापासून दूर नेतात. म्हणून समर्पण भावनेने साधना करणेच श्रेष्ठसिद्धी आहे.” असे संत म्हणजे भारताचे भूषण आहेत. सारांश, सर्व संत चरित्रांचे वैशिष्ट्य असे की ती आजही प्रत्येकाशी संवाद साधतात. म्हणून भारतीय युवकांनो, या चरित्रांतून बोध घेऊन, महायोगाच्या साधनेने आनंद प्राप्त करून, उच्च ध्येय ठेवून स्पर्धात्मक युगात यशस्वी होऊ या!
‘बुद्धीचे लेणे| ईश्वराचे देणे|’
……………………..