सुंदर ते ध्यान
चैतन्य तो
योगेश्वर कपिल महामुनींनी ‘ध्याना’बाबत श्रेष्ठ सिद्धांत सांगितला आहे. “ध्यानाच्या अभ्यासाने सत्वगुणांची वाढ होऊन ईश्वराविषयी प्रेम निर्माण होते.” या सिद्धांताची अनुभूति ऋषि, मुनि, संतांनी घेतली आहे. ध्यानाच्या अभ्यासाने आश्चर्यकारक प्रत्यक्ष घडलेले प्रसंग सर्वांना प्रेरणादायी आहेत. ते असे-
महामुनि कपिलांचे पिताश्री श्रीकर्दम ऋषि महान तपस्वी होते. त्यांनी अनेक वर्षे ध्यान केले. ऋषि कर्दमांची तपश्चर्या पाहून भगवंताच्या हृदयात दया निर्माण होऊन चित्त द्रवित झाले. त्यामुळे भगवंताच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंचे बिंदू खाली पडले. ते बिंदुसरोवर सिद्धपूर- मातृगया (गुजरात) म्हणून प्रसिद्ध आहे. महामुनि कपिल भगवंतांचा अवतार असून त्यांचा तत्त्वज्ञानाचा उपदेश म्हणजे ‘कपिल गीता’ होय.
सुप्रसिद्ध दत्तभक्त श्रीजनार्दन स्वामी देवगडावर रहात होते. दत्तप्रभूंशी त्यांचा संवाद होत असे. अशा श्रीजनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज श्रद्धा व समर्पित गुरुसेवेमुळे सद्गुरूंशी एकरूप झाले होते. एके दिवशी श्रीजनार्दन स्वामी ‘ध्याना’ला बसले होते. त्यावेळी संत एकनाथ महाराजांना संकेत मिळाला की गडावर शत्रूचे आक्रमण होत आहे. तात्काळ संत एकनाथ महाराज चिलखत घालून शस्त्रसज्ज झाले. त्यांनी शत्रूला पूर्ण पराभूत केले. पुन्हा गडावर येऊन गुरुसेवेत रममाण झाले.
श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामिमहाराजांनी श्रीगुरुदत्तयोगाची स्थापना केली. त्यांचे जीवन म्हणजे ‘मानवतेची गाथा’ आहे. त्यांचे परमशिष्य योगिराज श्रीगुळवणी महाराजांना हावनूरला (कर्नाटक) काही काळ श्रीगुरूंचा सत्संग लाभला. श्रीस्वामिमहाराज सदैव दत्तप्रभूंच्या ‘ध्याना’मध्ये निमग्न असत. योगिराज श्रीगुळवणी महाराजांनी “पुन्हा दर्शन कधी?” असे विचारताच श्रीस्वामिमहाराज म्हणाले “हे असेच कायम ‘ध्याना’त ठेवा. इकडे बघा” आणि आपला हात स्वतःच्या हृदयावर ठेवला. त्याक्षणी श्रीस्वामिमहाराजांच्या ठिकाणी ‘व्याघ्रांबरधारी श्रीदत्तप्रभूंचे’ दर्शन झाले. श्रीगुळवणी महाराजांनी ते दृश्य रेखाटले जे ‘श्रीवासुदेव निवास, पुणे’ येथे नित्यपूजनात आहे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे श्रीमद्भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या एका अध्यायात वर्णन केली आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रसन्न मनाने ‘ध्यान’ करीत असत. महर्षि व्यासांनी ‘ध्याना’चे प्रासादिक वर्णन केले आहे.
तात्पर्य संतश्रेष्ठ माऊलींच्या ‘ध्याना’बाबतच्या ओवीतून आनंद घेऊ या-
अगा योगी जो म्हणिजे | तो देवांचा देव जाणिजे |
आणि सुखसर्वस्व माझें | चैतन्य तो ||
…………………………