श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

इतरांस सुखी करावे

श्रीकृष्ण-अर्जुन संवादात अर्जुन विचारतो “देवा, वाऱ्याला अडवणे  जसे कठीण आहे तसे चंचल मनाला आवरणे अशक्य आहे.” भगवंत समजावतात “अर्जुना, बरोबर आहे. त्यासाठी एक अभ्यास आहे ज्याने मन ताब्यात राहते. तो अभ्यास म्हणजे ‘स्वस्थ बसणे, डोळे मिटणे, श्वासावर लक्ष ठेवणे’ असा आहे. हा अभ्यास
रोज करावा हे लक्षात ठेव.” अर्जुनाला या अभ्यासाचे मर्म समजले.

भारताच्या उत्तरेकडे स्वामी योगानंदांचा आश्रम आहे. आश्रमात आलेल्या एका तरुणामध्ये वरील अभ्यासाने झालेले परिवर्तन घडलेल्या प्रसंगातून पाहू. भारतातील एका उद्योगपतीचे अकाली निधन झाले. त्याच्या तरुण मुलावर सर्व जबाबदारी आली. तो कार्यालयात गेला. परंतु अनुभवाने, वयाने श्रेष्ठ अधिकाऱ्यांना पाहून तो घाबरला. “काय करावे?” असा प्रश्न त्याला पडला. मित्राच्या सांगण्यानुसार तो स्वामींच्या आश्रमात आला. स्वामीजींना नमस्कार करून तो म्हणाला “स्वामीजी, माझे वडील नुकतेच दिवंगत झाले आहेत. सर्व उद्योगाची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु मी वयाने लहान आहे, व्यवसायाचा अनुभव नाही, योग्य निर्णय घेता येत नाहीत. मी काय करू?” स्वामीजी तरुणाला गीतेमधील वरील अभ्यास सांगून म्हणाले “हा अभ्यास दररोज केल्यामुळे तुझी निर्णय क्षमता वाढेल.” तरुणाने स्वामींच्या सान्निध्यात राहून नित्य-नियमाने गीतोक्त अभ्यास केला. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. 

एके दिवशी स्वामीजी म्हणाले, “बाळा, चल माझ्याबरोबर.” दोघे आश्रमातील सरोवरापाशी आले. दुपारच्या वेळी सूर्याचे प्रतिबिंब सरोवरातील स्वच्छ पाण्यात पडले होते. “पहा सूर्याचे प्रतिबिंब” असे म्हणत स्वामीजींनी दंडाने पाणी हलवले आणि म्हणाले “बघ, सूर्य चंचल, वेडावाकडा दिसत आहे.” तरुण म्हणाला, “नाही नाही स्वामीजी! सूर्य चंचल नाही. पाणी हलल्यामुळे प्रतिबिंब चंचल दिसले.” स्वामीजी म्हणाले “मुला, तुला मर्म समजले!” स्वामीजींनी पुढे मार्गदर्शन केले “सूर्याची वेगवेगळी प्रतिबिंबे दिसली तरी सूर्य एकच आहे हे लक्षात घे. महत्त्वाचे असे की चैतन्यरूपाने एकच परमात्मा विश्वात व्यापलेला आहे. तो तुझ्यासह सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने ‘आपले हात भगवंतच आहेत’ असे समजून कर्म केले असता सर्वांचे कल्याण होते.” तरुणाला उपदेश समजला. त्याने भगवद्गीतेतील अभ्यास रोज केला. त्याचे आत्मबल वाढले. त्याच्याकडून शुद्ध-बुद्धीने कर्मे होऊन तो यशस्वी उद्योगपती झाला. हेच गीतोक्त महायोग अभ्यासाचे रहस्य आहे.

तात्पर्य, समर्थ म्हणतात-

‘आपुल्या पुरुषार्थ वैभवे | इतरांस सुखी करावे |’

……………………..

<< चैतन्याचे विश्वबंधुत्व