श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

मन विश्वरंगी रंगले

भारतातील महात्मे व संतांची चरित्रे मानवतेची दिव्यगाथा आहे. त्यांची दिव्यसाधना व उपासना असून त्यांनी समाज-सुधार कार्य व मौलिक उपदेश केला आहे. अशा साधन-सिद्ध महात्म्यांची चित्तशक्ति अत्यंत प्रभावशाली असते हे संत रविदासांच्या चरित्रातील प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून पाहू.

संत रविदास महात्मा होते. व्यवसायाने चर्मकार होते. रविदासांना स्वामी श्रीरामानंदांकडून शक्तिपात महायोग साधना प्राप्त झाली. विशेष म्हणजे त्यांना गुरुदेव स्वामी रामानंद, गुरुबंधु संत कबीर व शिष्या संत मीराबाई असे एकापेक्षा एक श्रेष्ठ संत लाभले. संतश्रेष्ठ रविदासांचा उपदेश असा- “कोणत्याही कुळात जन्म होणे जरी आपल्या हाती नसले तरी प्रयत्न करणे मानवाच्याच हाती आहे. म्हणून साधना, सत्संग, सेवा ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे.” अशा संत रविदासांची ‘महात्मा’ म्हणून प्रसिद्धी झाली. तरीही त्यांनी वडिलांकडून आलेला चर्मकाराचा व्यवसाय सुरूच ठेवला.

सर्व संतांच्याप्रमाणेच संत रविदासांनाही लोकांकडून त्रास झाला. परंतु त्यांनी अशा लोकांवरही प्रेमच केले. एकदा तत्कालीन विद्वान पंडितांनी द्वेषबुद्धीने रविदासांची तक्रार राजाकडे केली. राजाने रविदासांना दरबारात बोलावले. त्यावेळी रविदास म्हणाले, “महाराज, मी सामान्य चर्मकार आहे, गुरुनिष्ठ आहे.” परंतु “या दोघांपैकी खरे कोण?” हा संभ्रम राजाला झाला. प्रधानाने एक युक्ति सांगितली, “भगवंताची मूर्ति ठेवा. जो सामर्थ्यशाली असेल तो मूर्ति हलवून दाखवेल.” विद्वान पंडितांनी मंत्रोच्चार केले. परंतु मूर्ति स्थिरच राहिली. सिद्ध साधक असणाऱ्या रविदासांचे भावपूर्ण भजन सुरु झाले. त्यांच्या हृदयात करुणाभाव निर्माण होऊन, चित्त द्रवले, चित्तशक्ति क्रियाशील झाली परिणामी मूर्ति डोलू लागली. त्यावेळी रविदास भगवद्भक्तीत तल्लीन होते. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या पंडितांनी क्षमा मागितली आणि राजाने विचारले, “रविदासजी, हे कसे घडले?” विनम्रपणे रविदास म्हणाले, “महाराज, मैं तो श्रीगुरूदेवके चरणोंकी धूल हूं|” गुरुशक्तीचे हे कार्य आहे.” सर्वांनी रविदासांचे श्रेष्ठत्व मान्य केले. सारांश, संतांची चित्तशक्ति सामर्थ्यशाली असते हेच सत्य आहे.

रविदासांच्या चरित्रातील आणखी एक वैशिष्ट्य असे- गुरु स्वामी रामानंद वैष्णवपंथी, गुरुबंधु संत कबीर निर्गुणवादी, संत मीराबाई श्रीकृष्णाच्या परमभक्त आणि स्वतः संत रविदासांचा भगवंताप्रति दास्यभाव होता. अशा सर्व संतांच्या भक्तीचे स्वरुप भिन्नभिन्न असूनही शक्ति जागृतीचे साधन समानच होते.

तात्पर्य, विश्वबंधुत्व हेच संत रविदासांच्या चरित्राचे रहस्य आहे.

‘मन विश्वरंगी रंगले|’

……………………..

बुद्धीचे लेणे ईश्वराचे देणे  >>

<< सूर्य आत्मा जगतः