श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

नाही चालत तातडी

राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात “विश्ववंद्य रामकृष्ण परमहंसांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन व ईश्वराशी संवाद साधणे होय.” श्रीरामकृष्ण परमहंसांचे शिष्य श्रीगिरीशचंद्र घोष साहित्तिक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ते विद्वान होते परंतु अहंकारी, नास्तिक होते. एकदा श्रीरामकृष्ण व श्रीगिरीशचंद्रांची भेट झाली. श्रीरामकृष्ण म्हणाले, “प्रत्येकाला भगवती मातेवरील श्रद्धेनेच सर्व प्राप्त होते.” गिरीशचंद्र म्हणाले, “मी पापी आहे.” श्रीरामकृष्णांनी समजावले “रडगाणे गाणारा दुर्दैवी आहे.” गिरीशचंद्र म्हणतात, “मी जिथे जातो ते स्थान माझ्यामुळे अपवित्र होते.” श्रीरामकृष्ण एक उदाहरण देतात “हे बघ, अनेक वर्ष बंद व अंधार असलेली खोली मेणबत्तीच्या दिव्याने एकदम प्रकाशित होईल का हळूहळू प्रकाशित होईल?” स्वत: श्रीरामकृष्णच उत्तर देतात, “अंधार एकदमच नाहीसा होईल.” संभ्रमित झालेल्या गिरीशचंद्रांना “काय करावे” हे कळले नाही. तेव्हा श्रीरामकृष्ण समजावून सांगतात “भगवंताला शरण जा, नामसाधना, योगसाधना कर.” परंतु श्रीरामकृष्णांनी भाव-समाधीत “गिरीशचंद्र काहीही करत नाही” हे ओळखले. अखेर श्रीरामकृष्ण म्हणाले “ठीक आहे. तू मलाच समर्पित हो. तुझी सर्व जबाबदारी माझ्यावर अर्थात् ईश्वरावर आहे.” गिरीशचंद्र विचार करू लागले “माझे शरीर पापी आहे, ते मी गुरूंना कसे समर्पित करू?” म्हणून त्यांनी निश्चय केला की “शरीराने, मनाने, वाणीने होणारी प्रत्येक कृतीच गुरूंना अर्पण करू.” गिरीशचंद्र समर्पण भावनेने ‘साधना, सत्संग, सेवा या त्रिसूत्रीचे पालन करू लागले. त्यांची आंतरिक शक्ति जागृत होऊन गिरीशचंद्रांमध्ये परिवर्तन झाले. त्यांना परमानंदाची प्राप्ती झाली. ते म्हणतात “देव देखिला देखिला गुरुकृपे ओळखिला |” श्रीरामकृष्णांना आनंद झाला. यालाच शक्तिपात महायोग विज्ञान म्हणतात.

उपरोक्त प्रसंगातील बोध असा- आध्यात्मिक क्षेत्रात कष्टाविना उच्च ध्येयप्राप्तीची अपेक्षा करणे घातक आहे. धैर्याने, दीर्घकाळ, गुरुप्रदत्त साधना करणेच आवश्यक आहे. अशा साधकाची आंतरिक जागृत शक्तीच खरी संरक्षक असते. परंतु सध्याच्या युगात अभ्यास न करता खोटे यश प्राप्त करणे, कष्टाशिवाय संपत्ति व सत्ताप्राप्ती करणे अशा वृत्ति घातक आहेत. यासाठी कष्टाने विद्याप्राप्ती व कष्टाने संपत्ति प्राप्त करणे हेच यशस्वी मानवी जीवनाचे रहस्य आहे.

तात्पर्य, समर्पण-भावनेने, दीर्घकाळ शक्तिपात महायोग साधना करणेच श्रेष्ठ आहे. यामुळेच परमानंदाची प्राप्ती होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-

‘नाही चालत तातडी | प्राप्त काळ घडी आल्याविना |’

……………………..

चैतन्याचे विश्वबंधुत्व  >>

<< सतत साधना चैतन्याची