श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

सतत साधना चैतन्याची

भारताचे विद्याधन दिव्य, प्रासादिक आहे. या विद्यांचे प्रणेते ऋषि, मुनी, संतमहात्मे आहेत. त्यांनी तपश्चर्येने वैद्यकीय, वास्तुशास्त्र, रसायनशास्त्र, ज्योतिषादि शास्त्रे विश्वाला उपलब्ध करून दिली आहेत. हे भारताचे वैभव आहे. या शास्त्रांचा समावेश विविध विद्या व कलांमध्ये आहे. प्रत्येक मानवाला कलेची, विद्येची आवड असते. परंतु सुप्त कलेचे प्रकटीकरण अर्थात् स्वत:ला ते समजणे व दुसऱ्याला सांगण्याचे सामर्थ्य नसते. हे सामर्थ्य महायोग साधनेने आपोआप प्राप्त होते. यालाच चैतन्याची साधना म्हणतात. एक प्रसंग पाहू.

एक वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक शक्तिपात महायोगाचे साधक होते. त्यांना वनस्पती शास्त्राचे अचूक ज्ञान होते. त्यांचा एक मित्र होता. त्याला विंचू चावला. प्राध्यापकांनी उपचार करून विष उतरवले. मित्राने आनंदाने विचारले, “हे कसेकाय केलेस?” प्राध्यापक म्हणाले, “तुझ्याच अंगणातील वनस्पतीचा उपयोग केला.” मित्र म्हणाला, “दाखव पाहू ते झाड.” प्राध्यापकांनी झाड दाखवले. मित्र आश्चर्याने म्हणाला, “काय सांगतोस! हेंच ते झाड! हे माझ्या दररोज पाहण्यातले आहे. तुला कसे माहित?” प्राध्यापक म्हणाले, “वनस्पती शास्त्राच्या सखोल अभ्यासाने विष उतरविण्याऱ्या वनस्पतीची मला माहिती होती. त्याचा उपयोग केला. ” मित्राने आश्चर्य व्यक्त केले.

याचे स्पष्टीकरण करीत प्राध्यापक म्हणाले, “एक लक्षात घे. ज्ञानप्राप्तीसाठी कालावधी पाहिजे. माझ्या लहानपणचा प्रसंग असा. मी विद्यार्थी असतांना अभ्यास करूनही यश मिळत नव्हते. शिक्षकांनी समजावले, “बाळा, तू मन दुसरीकडे ठेवून नुसते नेत्र-जिव्हेने वाचन, पाठांतर करीत आहेस. अरे, नळाच्या वाहत्या पाण्याखाली घडा पालथा ठेवला तर त्यात पाणी भरले जाईल का? नाही, एक थेंबही नाही. तसेच केवळ नेत्र-कर्ण-जिव्हेने अभ्यास करशील तर ते ज्ञान बुद्धीत स्थिर राहणार नाही. मन एकाग्र करून अभ्यास कर, यश मिळेल.” या उपदेशाप्रमाणे मी अभ्यास केला आणि मला यश मिळाले. तसेच सद्गुरुप्राप्त महायोग साधनेने माझे ज्ञान समृद्ध झाले. हे रहस्य आहे.”

“आणखी एक उदाहरण लक्षात ठेव. टीव्हीवरील रेसिपी-शास्त्राचे वर्णन ऐकून पोट भरत नाही आणि आनंदही मिळत नाही. तो पदार्थ बनवून खाल्यावरच पोट भरते व आनंद होतो. तसेच पुष्कळ वेदान्त- शास्त्रग्रंथ पठणाने परमानंदप्राप्ती होत नाही. चैतन्याच्या साधनेनेच ग्रंथातील सिद्धांताची अनुभूति येते आणि परमानंद प्राप्त होतो. हे सत्य आहे.”

योगतपस्वी काकामहाराज म्हणतात-

‘सतत साधना चैतन्याची|’

……………………..

नाही चालत तातडी >>

<< बुद्धीचे लेणे ईश्वराचे देणे