tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

आजि आनंद आनंद

मानव जन्माची प्राप्ती ही भगवंताची कृपा आहे. परंतु अनंत विचारांचा गुंता यामुळे त्याची अनुभूति येत नाही. यासाठी संत महात्म्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ राष्ट्रपिता महात्मा गांधींना मिळालेल्या एका विशेष शिल्प भेटीतून त्यांनी ‘शांतीचा आनंदाचा’ संदेश भारताला दिला. एका फलकावर बसलेल्या तीन वानरांपैकी एकाचे हात डोळ्यांवर, दुसऱ्याचे कानांवर आणि तिसऱ्याचे मुखावर होते. यावरून ‘चांगलेच ऐकावे, चांगलेच बोलावे आणि चांगले पहावे’ हा संदेश महात्मा गांधींनी विश्वाला दिला.

आज आपल्या सभोवताली चांगले ऐकणे, बोलणे आणि दिसणे हे मनुष्य विसरून गेला आहे. याकरिता ‘ध्यान’ आवश्यक आहे. ‘ध्यै’पासून ‘ध्यान’ शब्द तयार झाला आहे. ‘ध्यान’ म्हणजे ‘शांतपणे डोळे बंद करून श्वासाकडे पाहत राहणे’. हे ‘ध्यान’ ज्या कृतीने साधता येते त्याला ‘योग’ म्हणतात. ‘योग’ म्हणजे ‘जोडणे’ अर्थात् ‘जो परमात्मा माझ्यात आहे तोच सर्व विश्वामध्ये आहे’ हे अनुभवणे होय. ध्यानाने उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त केलेल्या श्रीरामकृष्ण परमहंसांनी श्रीविवेकानंदांना “राम व कृष्ण एकच आहेत आणि ते मी आहे” असे ठाम सांगितले.

‘ध्यानाने’ डोळ्यांना चांगले पाहायची, कानाने चांगले ऐकण्याची व मुखाने चांगले बोलायची सवय लागते. म्हणून भगवंत म्हणतात “ज्ञानापेक्षा ‘ध्यान’ श्रेष्ठ आहे” कारण ‘ध्याना’मध्ये अनुभूति आहे. महाभारतातील एका प्रसंगातून हे समजावून घेऊ. महामंत्री विदुरांनी युधिष्ठिराला सांगितले, “हस्तिनापूरात जाऊन एक तरी वाईट मनुष्य शोधून काढ.” युधिष्ठिर म्हणाला, “मला कुठेही वाईट मनुष्य दिसत नाही.” याचे कारण असे की युधिष्ठिर रोज ध्यान करीत असल्याने त्याचे शरीर, मन बुद्धि स्वच्छच होती. या ध्यानामुळे त्याने माणसातच देवत्त्व पाहिले. त्याचप्रमाणे पाच वर्षाच्या बाल ध्रुवाने ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वराला हृदयात पाहिले आणि “देव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे” हा गीतोक्त सिद्धांत सर्व विश्वाला सांगितला.

तात्पर्य ‘स्वस्थ बसा, डोळे मिटा, पाहत राहा’ ही छोटी प्रक्रिया रोज आपण ९ किंवा २१ मिनिटे करून वरील अनुभव घेऊन आनंदित होऊ या. या ‘ध्यान’ अभ्यासाने आनंद मिळतो. म्हणून संत सांगतात –
‘आजि आनंद आनंद | मनी भरला पूर्णानंद ||’

म्हणजे जो आनंद म्हणतात तो ईश्वराच्या रूपाने हृदयातच आहे, त्याचा अनुभव घ्या.

……………………..

स्वस्थ बसा डोळे मिटा >>