सुंदर ते ध्यान
सूर्य आत्मा जगत:
संतश्रेष्ठ श्रीरमण महर्षींचा “साधनेचे अंतिम ध्येय आत्मदर्शन परमानंद आहे” हा उपदेश पाहिला, अर्थात् महायोग साधना तेजस्वी आहे. एक घडलेला प्रसंग पाहू.
एकदा श्रीरमण महर्षींच्या आश्रमात योगिराज श्रीगुळवणी महाराजांचे शिष्य आले. शिष्याने “मी गुळवणी महाराजांचा शिष्य आहे. त्यांनी दिलेली साधना मी करीत आहे” असे सांगितले. महर्षींना आनंद झाला. महर्षींनी आपल्या दिव्य दृष्टीने महाराजांना ओळखले. “आपण सांगता ते महाराज सूर्यासारखे तेजस्वी आहेत. त्यांनी दिलेली साधना दिव्य आहे” अशी श्रीरमण महर्षींनी स्तुति केली. आपल्या गुरुंबद्दलचे उद्गार ऐकून शिष्य आनंदित झाले.
‘साधना दिव्य आहे, सूर्यासारखी तेजस्वी आहे’ हे समजावून घेऊ. भारतात सूर्य उपासना श्रेष्ठ समजली आहे. ऋषींनी विश्वाच्या रचनेमध्ये सूर्याची प्राणाशी व चंद्राची मनाशी तुलना केली आहे. चंद्राला जशा पौर्णिमा व अमावस्या ह्या दोन विरुद्ध टोकाच्या अवस्था असतात, त्याचप्रमाणे मन काही वेळा उच्च अवस्थेत राहील तर काही वेळा कनिष्ठ अवस्थेला प्राप्त होईल. हा मनाचा विषय झाला. तसेच सूर्य जगाचा प्राण आहे. प्राण हेच चिरंतन तत्त्व आहे. प्राण म्हणजेच चैतन्यशक्ति. ही शक्ति शाश्वत आहे. ती विश्वाच्या स्थितीला कारणीभूत आहे. म्हणून वेदांनी ‘सूर्य हाच जगाचा आत्मा’ आहे असे वर्णन केले आहे.
महत्त्वाची बाब अशी की भौगोलिक दृष्टीने सूर्याच्या प्रकाशामुळेच चंद्र प्रकाशित दिसतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्य नसेल तर चंद्रही प्रकाशणार नाही. तसेच प्राण आणि मन यांच्या तुलनेत प्राण असेल तर मन आहे. समजा मनाचे चिंतन थांबले तरी मनुष्याचा कोणताही व्यवहार थांबत नाही. पण प्राणच जर नसेल (श्वासोच्छ्वास चालू नसेल) तर मनही राहणार नाही. अर्थात् प्राण असेल तरच मन आहे हे सिद्ध झाले. शरीर पडले की शरीरातील प्राण विश्वातील त्याच्या मूळ चैतन्यात विलीन होतो. म्हणून चंचल मन हे केव्हाही चिंतनासाठी आदर्श नाही. अर्थात् प्राणरूपी सूर्य हे शाश्वत, सत्य तत्व आहे. म्हणून चैतन्यशक्तीची-प्राणशक्तीची उपासना श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते. श्रीरमण महर्षींच्या “योगिराजांनी दिलेली साधना सूर्यासारखी तेजस्वी व दिव्य आहे” या गौरवोद्गाराचा अर्थ ‘महायोग साधना तेजस्वी व दिव्य आहे’ हे सत्य आहे.
तात्पर्य,
सूर्य आत्मा जगत:
……………………..