Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
मी चैतन्य आहे
एकाच श्लोकाचे, आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देणारे शंकराचार्यांचे अध्यात्म प्रकरण आहे. त्यातील अर्थ जाणून घेतल्यास सर्वसाक्षी व स्वयंप्रकाश आत्म्याचे यथार्थ ज्ञान होते. मनाला अत्यंत समाधान लाभते. कोणीही जिज्ञासू दर्शनाला आला, की आचार्य त्याच्याशी संभाषण करीत करीत, सहजच आत्मज्ञानाचा उपदेश देत असत. एक गृहस्थ आचार्यांकडे आला. भक्तिपूर्वक प्रणिपात करून म्हणाला, ‘महाराज, मला आत्मस्वरूपाचा उपदेश करावा. मी कोण आहे आणि कसा आहे, हे मला कळत नाही.’ आचार्यांनी प्रश्न विचारला, ‘कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो किंवा कोणाच्या प्रकाशाने तुला ज्ञान होत असते?’ त्यावर पहिले उत्तर सूर्यप्रकाश असे होते. पुढचा प्रश्न होता, ‘रात्रीच्या वेळी काय होते?’ त्यावरील उत्तर होते, ‘त्या वेळी दिव्याच्या प्रकाशाने सर्व पदार्थांचे ज्ञान होते.’ आचार्यांनी पुढील प्रश्न विचारला, ‘पण सूर्य, चंद्र किंवा प्रदीप इत्यादिकांचे ज्ञान तुला कशाने होते? सूर्य, दिवा इत्यादिकांच्या ज्ञानाचे साधन कोणते?’ त्या गृहस्थाचे उत्तर होते, डोळा. आचार्यांनी पुढील प्रश्न विचारला, ‘डोळे झाकल्यावर तुला ज्ञान होते की नाही?’ डोळे झाकल्यास, हात, पाय, कान, नाक इत्यादींच्या साह्याने ज्ञान होते, तेही बांधल्यास बुद्धीने ज्ञान होते असे उत्तर आले. आचार्यांचा पुढील प्रश्न खोलात जाणारा होता. त्यांनी विचारले, ‘बुद्धीचे ज्ञान कशाने होते?’ गृहस्थ म्हणाला, ‘महाराज, बुद्धीचे ज्ञान होण्याला मीच कारण आहे. मी आहे म्हणूनच मला सर्व काही कळू शकते.’ यावर आचार्य म्हटले, ‘अतो भवान् परमकं ज्योतिः।’ तू सर्व वस्तूंना प्रकाशित करणाऱ्या प्रकाशाचाही प्रकाश झालास; पण तुला प्रकाशित करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे? तू स्वयंप्रकाश आहेस. सर्वश्रेष्ठ प्रकाशस्वरूप तूच आहेस. तू शुद्ध चित्स्वरूप आहेस. तुझ्या व्यतिरिक्त प्रतीतीला येणारे सर्व पदार्थ दृश्य आहेत, म्हणूनच ते नाशवंत आहेत. तू मात्र त्या सर्वांचा द्रष्टा, साक्षी असल्यामुळे नित्य आहेस, अविनाशी आहेस. ही गोष्ट अर्थातच सिद्ध झाली.’ या प्रमाणे आचार्यांनी आत्म्याचे अविनाशित्व व स्वयंप्रकाशित्व सहज संभाषणात सिद्ध केले. त्या गृहस्थाने आचार्यांना प्रणिपात केला. आचार्य पुढे म्हणाले, ‘असाच तूदेखील एक अभ्यास कर. त्यातून या श्लोकाची प्रचिती येईल.’ त्या गृहस्थाला सांगितलेला अभ्यास होता, ‘स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा.’ गृहस्थाने याप्रमाणे अभ्यास केला आणि त्याला आनंद प्राप्त झाला.
……………………..