Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
अद्वैत
राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र श्रीशंकराचार्यांनी, अद्वैत वेदांत शास्त्राद्वारे, दिलेला आहे. त्यांची वाङमयसंपदा म्हणजे कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय होय. त्यांनी रचलेल्या विविध स्तोत्रांपैकी एका स्तोत्रामध्ये श्रीशंकराचार्य म्हणतात, “भगवंता, आपल्यात व माझ्यात कोणतेही द्वैत नाही. जोपर्यंत अज्ञान होते तोपर्यंत द्वैत होते. अद्वैत कायम आहे. परंतु प्रेमभावनेने आपल्याशी संवाद करताना जो आनंद होतो ते अनुभवामृत आहे.”
“मी आपल्या अधीन आहे, आपण माझ्या अधीन नाही. उदाहरणार्थ, वायूच्या अधीन श्वास आहे, श्वासाच्या अधीन वायु नाही. समुद्रातून तरंग होतो परंतु तरंगांचा समुद्र होत नाही. हे देवा, आपणच पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते निर्माण केली. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते पंचमहाभूतांच्या अधीन आहे. उदाहरण राजा असो, सेवक असो, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, तुमच्याशी एकरूपता प्राप्त झाली तरी शरीर असेपर्यंत तुमचे चिंतन राहणार आहे. मात्र सत्य एकच आहे की ‘मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, ही माझी शरणागती आहे.”
ही प्रार्थना ऐकल्यावर श्रीशंकराचार्यांना काशी विश्वेश्वर भिल्लवेशात दर्शन देतात. आचार्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्या मुखातून “शिवोSहम् शिवोSहम्, मी शिव आहे मी शिव आहे” असे स्वानुभवजन्य उद्गार बाहेर पडतात आणि भगवंताच्या आशीर्वादाने, आचार्यांनी अद्वैत वेदांत शास्त्राद्वारे विखुरलेला भारतीय समाज संघटित करण्याचे दिव्य कार्य केले.
आणखी एक प्रसंग भगवंत-उद्धव संवादामध्ये पाहू. भगवंत म्हणतात, “हे उद्धवा, माझ्याशी एकरूप होऊनही माझ्या उपासनापलिकडे तुला काहीही प्रिय वाटत नाही. तुझ्यासारखे भक्त मला फार आवडतात म्हणून मी निराकाराचा साकार झालो. तुझ्यासारख्या भक्तराजाला पाहण्यासाठी डोळे धारण केले. सद्भक्ताला दोनच हातांनी पोटभरून आलिंगन देता येत नाही म्हणून मी चार हातांचा झालो.” असे म्हणत म्हणत भगवंत उद्धवांना आलिंगन देतात. उद्धवांच्या मुखातून ‘एकम् एव अद्वितीयम्’ असे भावपूर्ण उद्गार बाहेर पडतात.
माऊली याचे तात्पर्य सांगतात –
“तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||
दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||”
……………………..