tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

वाङ्मयमूर्ती-प्रभूची

‘ग्रंथराज श्रीमद्भागवतमहापुराण’ हा महर्षि व्यासांनी ‘भागवतरूपी रस’ अर्थात् श्रीकृष्णचरित्र संपूर्ण जगाला दिले. परमभक्त उद्धवाने भगवंतांना विचारले, “देवा, भविष्य काळात मानवांना आपले दर्शन कसें मिळणार?” यावर भगवंतांनी उपदेश केला “मी माझे सर्व तेज या श्रीमद्भागवत ग्रंथात ठेवत आहे. माझे दर्शन या वाङ्मयमूर्तीरूपातच आहे.” म्हणून श्रीमद्भागवत ग्रंथ भगवंतांची सच्चिदानंद वाङ्मयमूर्ती आहे अशी अनुभूति येते. तसेंच ‘कृपा दाशरथी|’ “प्रभू रामचंद्रांच्या कृपेने श्रीदासबोध ग्रंथ निर्माण झाला आहे” अर्थात् ‘वाङ्मयमूर्ती श्रीरामाची’ असें समर्थ श्रीरामदासस्वामी प्रतिपादन करतात.   

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी “गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची||” या ओवीमधून “भगवद्गीता म्हणजे भगवंतांचीच मूर्ती आहे” असें स्पष्ट केलें आहे. हें घडलेल्या प्रसंगातून पाहूं. जगन्नाथपुरी येथे नित्य गीतापठण करणारे एक गृहस्थ होते. त्यांनी एकदा एका श्लोकात “‘योगक्षेमं वहाम्यहम्’ ऐवजी ‘योगक्षेमं करोम्यहम्’ असावें” असें वाटून त्याप्रमाणें पेन्सिलने काट मारून दुरुस्ती केली. नंतर तें कामासाठी बाहेर पडले. थोड्याच वेळात एक छोटा गोंडस बालक जड पोते घेऊन घरी आला. गृहस्थांच्या पत्नीने “हें काय आहे बाळा?” विचारताच बालक रडत म्हणाला, “माऊली, मला आपल्या पतीने हें ओझे द्यायला सांगितले. तें मला उचलत नव्हते तर त्यांनी मला मारले. बघा माझ्या गालावरील ओरखडे.” असें म्हणून बालक निघून गेला. गृहस्थ घरी परतल्यावर पत्नीने जाब विचारला, “अहो, त्या लहान बालकाला कां मारले आणि एवढे मोठे ओझे कां दिले?” गृहस्थ गोंधळले, “मला कोणी बालक भेटलाच नाहीं तर मी कसें मारीन.” नंतर त्यांच्या लक्षात आले “भगवद्गीता भगवंतांचे वाङ्मयरूप आहे. त्यात ‘करोम्यहम्’ या अयोग्य शब्दप्रयोगाने भगवंतांच्या गालावरच ओरखडे घेतले.” त्याचा पश्चाताप होऊन त्यांनी गीतेतील प्रत्येक पानावर ‘वहाम्यहम्’ लिहून देवाची क्षमा मागितली. सारांश, श्रीमद्भगवद्गीता भगवंतांचे वाङ्मयरूप आहे हेंच सत्य आहे.

तात्पर्य, भारतीय संस्कृतीमध्ये ऋषिंनी, संतांनी सिद्ध ग्रंथरूपी वाङ्मयाद्वारे समाजाला मार्गदर्शन केले. या ग्रंथांच्या श्रवण-पठनाने मनुष्य आनंदी होतो म्हणून ‘वाङ्मयमूर्ती प्रभूची’ हीच श्रद्धा आहे.

 श्रीस्वामिमहाराजांनी ‘श्रीदत्तमाहात्म्य’ ग्रंथात श्रीदत्तप्रभूला केलेली प्रार्थना प्रासादिक आहे.

“मी मागतों पसरून हात|
ह्या ग्रंथीं सतत सान्निध्य ठेवीं||

……………………..

गजेंद्र >>

<< उदयोSस्तु|