Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
सद्गुरु साधक संवाद
भारतीय तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी म्हणजे उपनिषद् ग्रंथ होय. उपनिषद् म्हणजे श्रीगुरुंच्या सान्निध्यात जीव, जगत्, जगदीश यांचा विचार व अनुभूतीचे ज्ञान प्राप्त करणे होय.
भारतात गुरुकुलांमधून श्रीगुरु शिष्य संवादातून सोप्या भाषेत शास्त्रांतील गूढार्थ सांगण्याची पद्धत होती. या दृष्टीने छान्दोग्य उपनिषदातील एक उद्बोधक प्रसंग पाहूं. ऋषि सत्यकाम ज्ञानी होते. शिष्य उपकोसलांनी सत्यकामांना विनंती केली, “गुरुदेव, मला ज्ञानप्राप्ती व्हावी.” श्रीगुरु उपकोसलांना “तूर्त अग्निची उपासना करा” असें सांगून परगावी गेले. उपकोसल निष्ठेने उपासना करीत होते. त्यांची ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा पाहून अग्निदेवता प्रसन्न होऊन मार्गदर्शन करतात, “उपकोसला, प्राणाची उपासना म्हणजे श्वासोश्वासाकडे लक्ष ठेवा. यामुळें सुखप्राप्ती होईल. परंतु ज्ञानाची प्राप्ती श्रीगुरुंकडूनच होईल.” असें सांगून अग्निदेव आशीर्वाद देतात. कालांतराने ऋषि सत्यकाम परत आल्यावर तेजस्वी उपकोसलांना विचारतात, “उपकोसला हें तेज कसें प्राप्त झाले?” उपकोसलांनी सर्व सांगितले. सत्यकाम प्रसन्न होऊन म्हणाले, “तुझी उत्तम तयारी झाली आहे.” दुसर्या दिवशी पहाटे सत्यकामांनी उपकोसलाला समोर बसवून महायोगाच्या कृपादानाने कृतार्थ केले. दिव्य अनुभूति येऊन उपकोसल ‘मी आनंदी आहे’ असें म्हणाले. सत्यकाम सांगतात, ‘उपकोसला, सतत साधना चैतन्याची हें सूत्र लक्षात ठेव.’ सारांश, स्वप्न दीक्षा किंवा दैवी दीक्षा प्राप्त झाली तरीही श्रीगुरुंकडूनच प्रत्यक्ष दीक्षाप्राप्ती प्रभावशाली आहे हें रहस्य आहे.
आणखी एक मुण्डकोपनिषदातील श्रीगुरु शिष्य संवाद असा. श्रीगुरु विद्यार्थांना सांगतात, “निसर्गाकडे पहा. उंच डोंगरावरील औषधी वनस्पती कशी उगवली? त्यांच्यातील चैतन्यामुळें. तसेंच कोळी स्वतःमधूनच आपले जाळे विणतो, स्वतःमध्येच ते ओढून घेतो. हेंही त्याच्यातील चैतन्यामुळेंच. विश्वाची उत्पत्ति चैतन्यापासूनच होते. सृष्टितील प्रत्येक पदार्थ चैतन्यस्वरूपच आहे. म्हणून मुलांनो, चैतन्याच्या साधनेने आत्मबल वाढवून सर्वांगीण विकास करा.” याप्रमाणे विद्यार्थी, खरा मार्ग समजल्याने, आनंदित होतात. तात्पर्य, उपनिषद् ग्रंथ ज्ञानप्राप्तीचे उत्तम साधन आहे हेंच खरें.
संत सांगतात,
‘देवदेव म्हणतां, देव कोठें आहे|
सद्गुरुनें सोय सांगितली ||’
…………………….