Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Shree Vasudev Niwas
सगुण निर्गुण
चिंतामणी
प्रभु श्रीरामचंद्र व मुनिवसिष्ठ संवाद म्हणजे ‘योगवासिष्ठ’ होय. या प्रासादिक ग्रंथात कथांमधून सोप्या भाषेत तत्त्वज्ञानाचे रहस्य सांगितले आहे.
यातील ‘चिंतामणी’चा विषय एका प्रसंगातून पाहूं. एक श्रीमंत, व्यवहारकुशल गृहस्थ होता. त्याला “चिंतामणी मिळावा” अशी इच्छा झाली. म्हणून त्याने दृढनिश्चयाने दीर्घकाळ तपश्चर्या केली. कालांतराने त्याच्यासमोर चिंतामणी प्रकट झाला. परंतु संकल्पाचे अर्थात निर्णयाचे विकल्पात म्हणजे संशयात परिवर्तन झाल्याने त्याने विचार केला, “चिंतामणी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न लागतात, मला इतक्या लवकर कसा मिळाला? चिंतामणीच आहे कां? उचलून बघू कां? नको, गुप्त झाला तर?” साशंक मनःस्थितित तो चिंतामणीकडे बघत राहिला. चिंतामणीला ‘मी खरा असूनही हा अव्हेर करतो’ हें असह्य होऊन तो अदृश्य झाला. गृहस्थाने पुन्हा चिंतामणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. खरा चिंतामणी सोडून पुन्हा त्याच्या प्राप्तीसाठी त्याला तप करताना पाहून तेथे असलेल्या थट्टेखोर लोकांनी त्याच्या नकळत त्याच्यासमोर चकचकीत काचेचा तुकडा ठेवला. गृहस्थाने काचेलाच चिंतामणी समजले. त्याने विचार केला “चिंतामणीने खूप संपत्ति मिळणार आहे, या संपत्तिचे काय करायचे?” त्याने सर्व संपत्ति दान केली. वनात जाऊन त्याने काचेच्या तुकड्याला प्रार्थना केली. परंतु कांहींच न मिळाल्याने तो निराश झाला. अशा रीतीने विकल्पामुळे त्याची संपत्तिही गेली आणि खरा चिंतामणीही गेला. सारांश, विकल्प हीच आपत्ति आहे हेंच खरें. मनुष्य अनेक उत्तम संधि विकल्पामुळें गमावतो. संकल्प दृढ होण्यासाठी उपासनेने साधनेने मन बुद्धी स्थिर करणें आवश्यक आहे.
सर्व शास्त्रकारांनी एकमताने सांगितले आहे कीं मानवाने “संकल्प हा भगवंताचाच आहे माझा नाहीं” हीं समर्पण भावना ठेवावी. ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ हें वास्तव आहे. म्हणून मनुष्याने सत्य संकल्पच केला पाहिजे हें महत्त्वाचे सूत्र आहे.
तात्पर्य श्रीस्वामिमहाराज सांगतात-
‘माझी मति अल्प |
जरि माझें मनीं विकल्प |
देवा तूं सत्य संकल्प |
माझें निर्विकल्प मन केलें ||’
……………………..