Vasudev Niwas | © 2023 All rights reserved | Developed by Digital Canvas
सगुण निर्गुण
दैव आणि प्रयत्न
योगवासिष्ठात प्रभु रामचंद्रांनी भगवान् वसिष्ठांना प्रार्थना केली, “सर्वत्र ‘दैव’ याबद्दल खूप चर्चा आहे. ‘दैव’ खरें आहे कीं खोटे हें मला समजावून सांगावे.” वसिष्ठ मुनि समजवतात, “पूर्वी केलेल्या कर्मांच्या व्यतिरिक्त दैव म्हणजे अन्य कांहीं वस्तु नाहीं. ज्योतिषाने एखाद्या व्यक्तिचे नामांकित पंडित होण्याचे भविष्य सांगितले. परंतु अभ्यासाविना तो मनुष्य पंडित होणे शक्य नाहीं. ‘दैव बलवत्तर” हा दुबळेपणाचा विचार असून दु:खाच्या प्रसंगी मनुष्याचे थोडे समाधान व्हावे एवढा पुरताच त्याचा उपयोग आहे. दैव कुणाचे चांगले किंवा वाईट करु शकत नाहीं. दैव फक्त कल्पनेचा खेळ आहे. त्याला अस्तित्व नाहीं. सर्व कर्तृत्व आणि भोक्तृत्व मानवी प्रयत्नांमुळेच आहे. दैवाचा कर्तृत्व भोक्तृत्वाशी संबंधच नाहीं. आज प्रायश्चित्त घेतले की कालच्या वाईट कर्मांची पातके नाहींशी होतात असें शास्त्र सांगते. म्हणून बुद्धिमान मनुष्य दैवाला न मानता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत सतत उत्तम प्रयत्न करतो. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा तीन्ही स्तरांवरील एकत्रित प्रयत्नांना ‘मनापासूनचा प्रयत्न’ म्हणतात. अशा अथक प्रयासानेच मनुष्य यश प्राप्तीचा अनुभव घेतो. मातीच्या ढेकळाची सुंदर मूर्ती बनवणे हें मूर्तिकाराच्या प्रयत्नानेच शक्य आहे. थोर व्यक्तींनीही ‘पौरुष प्रयत्नांचाच’ आश्रय घेऊन समाजात प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळवली आहे.”
सारांश, कोणत्या कुळात जन्म होणे जरी आपल्या हाती नसले, तरी प्रयत्न करणें मानवाच्याच हाती आहे. काल झालेले अजीर्ण आज केलेल्या लंघनानेच नाहींसे होते. म्हणून भारतीय तत्त्वज्ञान व शास्त्रे एकमताने सांगतात, ‘स्वप्रयत्न, शास्त्राभ्यास आणि गुरुंवर श्रद्धा हीं यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे. हें लक्षात ठेवून मनुष्याने नेटाने उत्तम प्रयास करीत राहणे हेंच आजच्या काळात आवश्यक आहे.’
तात्पर्य, संत म्हणतात-
‘कर्म करे किस्मत बने |
जीवन का यह मर्म ||
प्राणी तेरे हाथ में |
तेरा अपना कर्म ||’
……………………..